पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२११
 

 महाराणा रणजितसिंग यांनी शीखसमाज संघटित केला. त्यामुळे ३०-४० वर्षे त्यांना पठाण आक्रमणापासून वायव्य भारत मुक्त ठेवता आला. त्याचवेळी इंग्रजी सत्ता प्रबळ होत होती. त्या आक्रमणापासून भारताचे रक्षण करण्याचे सामर्थ्य मात्र महाराजांना किंवा त्यांच्या राज्यातील पंडित, मुत्सद्दी यांना निर्माण करता आले नाही. ते सामर्थ्य पाश्चात्य विद्येच्या अभ्यासाने प्राप्त होणाऱ्या ज्या राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व विज्ञाननिष्ठा या विद्या त्यामुळे अधिगत झाले असते. १८०९ नंतर स्वतंत्र सत्ताधारी शीखसमाजाला हे अशक्य नव्हते. महाराजांच्या दरबारी मंडळींना ही दृष्टी असती तर त्यांनी त्याच वेळी युरोपला विद्यार्थी धाडले असते; जर्मनी, फ्रान्स येथून शास्त्रज्ञ, पंडित यांना बोलावून पंजाबात विद्यापीठे उघडली असती. बंगालमधील राजा राममोहन रॉय यांनी १७९५ सालीच युरोपीय भाषांचा अभ्यास सुरू केला होता आणि १८१४ च्या सुमारास पाश्चात्य विद्याप्रसारासाठी कॉलेजही काढले होते. इंग्रजांनी भारताला जिंकले ते भौतिक विद्या व संघटनविद्या यांच्या बळावर. अमेरिकेशी १८५४ साली संबंध येताच जपानी नेत्यांनी १०-२० वर्षांतच त्या विद्यांची उपासना सुरू केली. महाराजा रणजितसिंग यांनी लष्कराच्या बाबतीत पाश्चात्य विद्येचा अंगीकार केलाच होता. त्यांची सेना यामुळेच अत्यंत कार्यक्षम झाली होती. या दृष्टीने शीखसमाजातील नेते, पंडित, इतर प्रमुख नागरिक यांनी १८१० च्या सुमारास पाश्चात्यांची भौतिकशास्त्रे, त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, ज्ञानलालसा, ऐहिकता इ. त्यांचे इतर जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचा प्रसार पंजाबात करण्याचे ठरवून त्यासाठी शाळा, प्रशाळा, महाशाळा, ग्रंथालये, प्रयोगशाळा स्थापन केल्या असत्या तर इंग्रजी आक्रमणापासूनही शीखांना भारताचे रक्षण करता आले असते. पण शीखधर्मातील क्रांतितत्त्वांचा त्यांना विसर पडल्यामुळे त्यांना ती दृष्टी प्राप्त झाली नाही. त्यामुळे चाळीस वर्षे दृढ अशा शासनाचा लाभ होऊनही त्यातून कोणत्याही प्रकारचे नवे कर्तृत्व, नव्या परंपरा निर्माण झाल्या नाहीत आणि रणजितसिंग जाताच शीख पराभूत झाले.
 रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांना गेल्या हजार वर्षांत परकीय आक्रमकांपासून स्वदेशाचे रक्षण करण्यात कितपत यश आले, ते यश कोणत्या प्रेरणेमुळे आले, त्यांनी आपल्या समाजात कोणती क्रान्तीबीजे पेरली, कोणत्या संघटनतत्त्वांचा अंगीकार केला याचा विचार येथवर आपण केला. त्याचप्रमाणे या