पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

लष्कराधिकारी हात जोडून विनवू लागले की, 'अटक ओलांडण्यास सांगू नका. कारण ते धर्म्य नाही.' त्यावेळी महाराज संतापले आणि म्हणाले, 'ज्यांच्या मनात बंदी असते त्यांना अटकबंदी योग्य आहे. खालसाला हे बंधन नाही.' गुरु नानक यांनी हेच सांगितले होते !

हेही नाही, तेही नाही :
 शीखांच्या निष्फळ पृथगात्मतेचे विवरण मागे केलेच आहे. गुरू नानक यांच्या उपदेशात हिंदुसमाजासुन पृथक् होण्याविषयी एक वाक्यही सापडत नाही. त्यांचा धर्म हा गीतेतील कर्मयोग होता. तो पुढे रामदासांनी सांगितलेला प्रवृत्तिधर्म होता. 'शीखिझम ॲज प्रीच्ड् बाय नानक' या आपल्या लेखात डॉ. एल्. रमा कृष्ण यांनी गीतेतील व नानकांच्या उपदेशातील अनेक वचने देऊन नानकांचा धर्म हा गीतेतला कर्मयोगच होय, हे स्पष्ट केले आहे. (महाराजा रणजितसिंग सेंटेनरी व्हॉल्यूम- पृ. ९५) पण पुढील गुरूंनी याच क्रांतिबीजांचा विकास करण्याऐवजी शीखसमाजाला हिंदुधर्मग्रंथ, आचारविचार, तीर्थक्षेत्रे ही वर्ज्य ठरवून त्याला नवे आचार लावून दिले. याने त्या समाजाला स्वतंत्र अस्मिता प्राप्त झाली. पण पुढे ती केवळ बाह्याचारापुरतीच राहिली. इतरांपासून विभक्त पण अंतरात अत्यंत संघटित अशा समाजाच्याच स्वतंत्र अस्मितेला किंमत असते. पृथगात्म समाज अत्यंत क्रांतिप्रवण व अत्यंत संघटित असावा लागतो. शीखसमाजात पुढच्या काळात ही दोन्ही लक्षणे दिसेनाशी झाली. आणि गुरू गोविंदसिंगांनी घालून दिलेल्या केस, कछ, कडे इ. आचारांना निर्जीव कर्मकांडाचे रूप आले. यामुळे शीखांना अखिल हिंदुसमाजात क्रांतीची बीजे पेरताच आली नाहीत. आगरकरांनी सुधारणेचा उपदेश करण्यास प्रारंभ केला तेव्हा 'तुम्ही वेगळी जात का करीत नाही ?' असे सनातनी त्यांना विचारू लागले. तेव्हा 'मला या समाजातच राहावयाचे आहे, कारण मला या समाजाची सुधारणा करावयाची आहे. वेगळी जात मी करणार नाही.' असे त्यांनी उत्तर दिले. रामदासी, वारकरी यांनी वेगळी जात केली नाही. ते पृथगात्म झाले नाहीत, जुन्या परंपरेचा धागा त्यांनी तोडला नाही. शीखसमाजाने ते केले. आणि पृथगात्मतेची पथ्येही पाळली नाहीत. त्यामुळे दोन्हीकडूनही त्याला अपयश आले.