पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२०९
 

यांच्या सर्वांच्याच शीखसमाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, असे दिसते. पण त्या सफल झाल्या नाहीत. याच्या कारणांचा शोध आपण घेतला पाहिजे.

विकास नाही :
 याचे पहिले कारण असे स्पष्ट दिसते की, गुरू नानक यांनी जी क्रान्तिबीजे हिंदुसमाजात रुजविली त्यांचा विकास पुढे झाला नाही. त्यांनी वेद, पुराणे इ. धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानले नाही, आपल्या स्वतंत्र बुद्धीने काही धर्मतत्त्वांचा उपदेश केला. पण पुढे बुद्धिप्रामाण्याची ही परंपरा अल्पावधीतच नष्ट झाली. शीखांचा 'ग्रंथसाहेब' हा वेदांच्या ठायीच येऊन बसला आणि धर्मकान्तीची मूळ प्रेरणाच नष्ट झाली. संगतपंगत निर्माण करून गुरूंनी समाजातील उच्चनीचता नष्ट केली याची कथा अशीच आहे. एकत्र रसोई शीखांनी केली, कोणाच्याही हातचे ते अजूनही खातात; पण याच्याच पुढची पायरी म्हणजे जे आंतरजातीय विवाह, तिच्याकडे शीखसमाज वळलेला नाही. सर्व शीखसमाजात सरमिसळ तर विवाह होत नाहीतच; पण जाती-पोटजातींच्या पलीकडेही ते फारसे जात नाहीत. समाजात कोणी मुसलमान नाही, कोणी हिंदू नाही, असे गुरू नानक सांगत. जो धर्म कोणत्याही प्रकारची उच्चनीचता मानतो तो धर्मच नव्हे, असे गुरू गोविंदसिंग म्हणत. पण या उपदेशाची साहजिक परिणती म्हणजे सर्व समाज एक रक्ताचा होऊन जाणे ती शीखांनी केली नाही. वैवाहिक क्षेत्रात उच्चनीचता हिंदूंच्याप्रमाणेच जपून ठेवली. परदेशगमनाचे तेच झाले. गुरू नानक बगदाद, रोमपर्यंत जाऊन आले. चीनमध्येही ते गेले होते. त्यानंतर काही शीख व्यापारी दर्यावरचा व्यापार करीत असा उल्लेख सापडतो. पण इतकेच. समुद्रगमननिषेध या रूढीचा शीखांनी त्याग केला असे दिसत नाही. गुरूंनी ती बंधने नष्ट करताच इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांच्याप्रमाणे जर शीख जगभर फिरू लागले असते तर त्यांच्या देशातल्याप्रमाणे येथेही विद्येचे पुनरुज्जीवन झाले असते आणि सोळाव्या-सतराव्या शतकातच शीखसमाज त्या पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे भौतिक विद्येने संपन्न झाला असता. पण ती विद्या येथे येण्यास एकुणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. कारण शीख हे समुद्रगमन- निषेधाच्या रूढीचे शेवटपर्यंत गुलामच राहिले. १८२३ साली महाराजा रणजितसिंग यांना अटक नदी ओलांडून सेना पलीकडे न्यावयाची होती. पण
 १४