पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

संघटन-विघटनेचा इतिहास येथपर्यंत आपण पाहिला. आता भारतावर होणाऱ्या परकीय आक्रमणाचा प्रतिकार करणारी, रजपूत, कर्नाटकी, मराठे यांच्यासारखी एक शक्ती या दृष्टीने शीखांच्या यशापयशाचे विवेचन करू.

यशापयश :
 मुस्लीम आक्रमणाचा प्रतिकार करणारी पंजाबात एक स्वतंत्र शक्ती शीखांनी निर्माण केली हे त्यांचे पहिले मोठे यश होय. मराठ्यांनी औरंगजेबाच्या प्रचंड सेनासामर्थ्याचा दक्षिणेत निःपात केला आणि नंतरच्या ८०-८५ वर्षाच्या काळात दिल्लीची सलऩनत निर्जीव व नामशेष करून टाकली हे खरे. पण पंजाब, पेशावर या प्रदेशांत एकदोन भराऱ्या मारण्यापलीकडे त्यांना काही साधले नाही. अशा स्थितीत शीखांचा उदय तेथे झाला नसता तर सिंध, बलुचिस्तान, अफगाणिस्थान यांच्याप्रमाणेच पंजाब, पेशावर, काश्मीर हे प्रदेश हिंदुत्व, हिंदुसंस्कृती व हिंदुस्थान यांना पारखे होऊन मुस्लीम जगतात विलीन झाले असते. पण गुरू गोविंदसिंग, बंदा बहाद्दर, सहस्रसंख्येने धर्मार्थ आत्मबलिदान करणारे त्यांचे अनुयायी, अहंमदशहा अब्दालीसारख्या कसलेल्या कडव्या मुस्लीम सेनापतीशी सतत तीस वर्षे लढा चालू ठेवणारे मंझाशीख आणि महाराजा रणजितसिंग यांच्या पराक्रमामुळे भारतावरचा तो अनर्थ टळला. एका फार मोठ्या भयानक विपत्तीतून हिंदुसमाजाचे शीखांनी रक्षण केले. हे पराक्रमी शूर पुरुष तेथे पहाडासारखे उभे राहिले नसते तर पठाणांनी पंजाब सर्व गिळून कदाचित उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश यांवरही आक्रमण केले असते. रोहिले, नबाब, मालवा शीख व रजपूत संस्थानिक त्यांच्या स्वागताला कसे सिद्ध होते हे मागे सांगितलेच आहे. तेव्हा ही सर्व घोर आपत्ती टळली याचे श्रेय शीखांनाच आहे याबद्दल वाद होऊच शकणार नाही.
 पण शीखांनी प्रारंभी घडविलेली सामाजिक क्रान्ती, स्वसमाजाला प्राप्त करून दिलेली स्वतंत्र अस्मिता, धर्मासाठी त्यांनी केलेले बलिदान यांचा विचार करता हे त्यांचे यश फार मर्यादित आहे, असे म्हणावे लागते. सर जोगेन्द्रसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे, अखिल भारताला संघटित करण्याची संधी खालसाला आली होती ती त्याने घालविली. प्रा. हरिराम गुप्ता, डॉ. नरेन्द्रकृष्ण सिन्हा, कुशावतसिंग, ठाकुर देशराज हे सर्व जे शीखांच्या कार्याचे विवेचन करणारे इतिहासकार