पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२०७
 

आणि भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आपले प्रभुत्व नेऊन भिडविले. कुशावतसिंग म्हणतात, 'हा पराभव अगदी निकाली झाला. पंजाबी खड्ग हे टोळीवाल्यांच्या खड्गापेक्षा श्रेष्ठ आहे याची त्याने पठाणी टोळ्यांना खात्री करून दिली.' [रणजितसिंग- पृ. १५२] मराठ्यांनी आरंभिलेले कार्य या विजयाने पुरे झाले. पेशावरपासून कन्याकुमारीपर्यंत मुस्लीम सत्ता नि:शेष झाली.

जुनी कहाणी :
 महाराजा रणजितसिंग यांचे हे पराक्रम म्हणजे शीख समाजाच्या कर्तृत्वाचा कळस होय. पंजाबचा व शीखसमाजाचा इतिहास या यशाने धवळून निघाला आहे. एवढे थोर कार्य करून हा असामान्य पुरुष १८३९ साली कालवश झाला आणि दुर्दैव असे की त्याच्याबरोबरच शीखांची संघटनविद्याही कालवश झाली. अत्यंत खेदाची गोष्ट अशी की एवढ्या मोठ्या कर्तृत्वातूनही कर्त्या पुरुषांची नवी पिढी निर्माण झाली नाही. चाळीस वर्षांच्या या यशस्वी कारकीर्दीतही शीखसमाजावर धर्म, राष्ट्र अशा संघटनतत्त्वांचे टिकाऊ असे संस्कार होऊ शकले नाहीत. आणि महाराजांचा मृत्यू होताच यादवीची पूर्वीची कहाणी सुरू झाली. हा सर्व दुःखद् इतिहास आर. सी. मजुमदार यांनी सविस्तर दिला आहे. (ब्रिटिश पॅरामाउंटसी- भाग १ ला) महाराजांचे वारस अगदी नादान व नालायक निघाले. खरकसिंग व शेरसिंग हे त्यांचे दोन पुत्र गादीसाठी भांडू लागले. त्यांतील एक अर्धवट होता व दुसरा चारित्र्यहीन होता. दरबारातही अनेक फळ्या पडल्या असून प्रत्येक पक्षांची कारस्थाने चालू झाली होती. महाराजांनी उभारलेली सेना अति उत्कृष्ट होती. पण त्यांच्यामागे तिलाही चारित्र्य, ध्येय, निष्ठा काही राहिले नाही. जो पक्ष जास्त पगार कबूल करील त्याच्या बाजूने ती कत्तली करू लागली; खून पाडू लागली. सेनाधिकारी पराकाष्ठेचे उद्धट व वेजबाबदार झाले. यामुळे भारताच्या इतिहासातील नित्याचा रोग बळावून एका पक्षाने इंग्रजांना निमंत्रण दिले. ते याची वाटच पहात होते. त्यांच्याजवळ सामर्थ्यही होते. दोनतीन लढायांतच त्यांनी शीखांचा निःपात केला आणि पंजाब खालसा करून टाकला. रणजितसिंगांच्या पराक्रमाची परंपरा दहा वर्षेसुद्धा टिकली नाही.
 गुरू नानक यांच्यापासून महाराजा रणजितसिंग यांच्यापर्यंत शीखसमाजाच्या