पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
 

उत्तरकाळाचे चातुर्वण्याचे शास्त्र असे की ब्राह्मण स्त्री व क्षत्रिय पुरुष यांची संतती ती सूत किंवा क्षत्रिय स्त्री व वैश्य पुरुष यांची ही संतती. कसेही म्हटले तरी हा प्रतिलोम विवाह होय. अर्थात त्यांची संतती शुद्र ठरते. अशा या शूद्र सौतीनेच पुराणज्ञान सांगितले आणि शौनकासारख्या तपोनिष्ठ ब्राह्मणाने ते श्रवण केले ! पुढील काळात हे पुष्कळांना रुचले नाही. व त्यांनी रोमहर्षण सूत हा निराळा होता असे सांगितले आहे. पण प्राचीनांना आर्यत्व गुणांवर अवलंबून आहे असे वाटत असल्यामुळे यात आक्षेपार्ह असे काहीच वाटले नाही.
 म्लेंच्छ व यवन या अगदी परकीय, भारतबाह्य व हीन जमाती मानल्या जातात. पण त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे ? ययातीचे यदु, तुर्वसु, द्रुह्यु, अनु व पुरु असे पाच पुत्र. यांतील तुर्वसूचे पुत्र ते यवन व अनूचे ते म्लेच्छ असे महाभारत सांगते.

यदोस्तु यादवा जाताः तुर्वसोर्यवनाः स्मृताः ।
द्रुह्योः सुताःतु वै भोजा अनोस्तु म्लेंछजातयः ॥

 याचा अर्थ असा की अत्यंत श्रेष्ठ आर्य असे जे यादव, पौरव, भोज त्यांचे म्लेंच्छ, यवन हे अगदी रक्तसंबंधाने भाईबंद होते. (आदि. ८५-३५)
 आंध्र, पुंड्र, शबर, पुलिंद व मूतिब या सर्व अनार्य जमाती. पण त्यांची उत्पत्ती कशी झाली होती ? हे सर्व विश्वामित्राचे पुत्र होते. ऐतरेय ब्राह्मण म्हणते की, 'शुनःशेपाला भाऊ मानण्याचे त्यांनी नाकारले म्हणून संतप्त होऊन विश्वामित्राने त्यांना शाप दिला व ते अनार्य झाले.' म्हणजे अत्यंत हीन गणलेली ही संतती ऋग् मंत्रांची रचना करणाऱ्या विश्वामित्राची प्रजा होती. (ऐतरेय ब्राह्मण ८-१८.)

शक-हूणांचे आर्यीकरण :

 ऐतिहासिक कालात (इसवी सनाच्या पहिल्या ३-४ शतकांत) शक, यवन (ग्रीक), कुशान, हूण, या भारतावर आक्रमण करून येणाऱ्या जमातींचे आर्यकरण कसे झाले हे पाहिले तर वेदकाळात काय व कसे घडले असेल याची चांगली कल्पना येईल, शक, कुशान, हूण, या जमाती अत्यंत हिंस्र,