पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

नेत्याला हे साधले नव्हते. महाराजांना हे साधले म्हणूनच त्यांचे स्वराज्य- साम्राज्याचे ध्येय काही अंशी तरी सिद्ध झाले.

ध्येयपूर्ती :
 कसूरचा नवाब कुत्बुद्दिन, मुलतानचा मुजफरखान, मुंधेर म्हणजे डेरा इस्माइलखान येथील नबाब हाफीज अहंमद यांना पंजाबवर शीखांचे प्रभुत्व स्थापन झाले हे सहन झाले नाही. त्यांच्या निष्ठा अफगाणिस्थान- काबूल येथील सुलतानावर होत्या. महाराजांना त्यांनी सतत विरोध केला होता. यांपैकी प्रत्येक नबाबापाशी २०-२५ हजार लष्कर रणांगणात उभे करण्याचे सामर्थ्य होते आणि जिहादची घोषणा करून त्यांच्या शौर्याला कडवेपणाची धार आणण्याचे कौशल्यही त्यांच्या ठायी होते. शीखांची धर्मनिष्ठाही अशीच कडवी होती. पण इतके दिवस ते संघटनविद्या पढले नव्हते. रणजितसिंगांनी त्यांना व पंजाबांतील हिंदूंना संघटित करताच त्या समाजात एक अभूतपूर्व सामर्थ्य निर्माण झाले व त्याने विजयामागून विजय मिळवून मुस्लीमांपासून पंजाब तर मुक्त केलाच पण वायव्यप्रांत व काश्मीर हेही मुक्त केले. या कार्याच्या सिद्धीसाठी महाराजांना जे संग्राम करावे लागले त्यांत हजरोचा व नौशेराचा असे दोन संग्राम विशेष उल्लेखनीय आहेत. महाराजांनी अटकेचा किल्ला घेतला हे काबूलचा वजीर फत्तेखान याला सहन न होऊन त्याने प्रचंड सैन्यानिशी किल्ल्याला वेढा घातला. यावेळी किल्ल्याजवळच्या हजरोच्या मैदानात मातबर झुंज होऊन शीखांना जय मिळाला. या विजयाचे महत्त्व फार आहे. वायव्येकडून येणाऱ्या पठाण सैन्याशी समोरासमोर लढाई करून, गेल्या सातशे वर्षांत हिंदूंनी कधी विजय मिळविला नव्हता. दहाव्या शतकाच्या अखेरीस जयपाळ, अनंगपाळ यांचा पराभव झाल्यापासून तीच लांछनास्पद परंपरा शतकानुशतक चालू राहिली होती. हजरोच्या लढाईने कालचक्र उलटून टाकले व तो कलंक धुऊन काढला. १८१९ साली वजीर फत्तेखान याचा भाऊ महंमद जबारखान याचा सोपियाच्या लढाईत पराभव करून शीख सेनेने काश्मीर जिंकले. १८२२ साली नवाब हफीज अहंमदखान याच्या २५००० पठाणांचे निर्दालन करून सेनापती हरिसिंग नलुआ याने डेरा इस्माइलखान परगणा जिंकला. नौशेराची लढाई १८२३ साली झाली. तीत विजय मिळवून महाराजांनी पेशावर जिंकले