पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२०५
 

पासून संरक्षण मिळावे म्हणून इंग्रजांकडे धाव घेतली. इंग्रजही आपल्याला खाऊन टाकतील अशी भीती त्यांना होती. पण रणजितसिंग म्हणजे अर्धांगवायू व इंग्रज म्हणजे क्षय, असा त्यांचा दृष्टिकोन होता. अर्धांगवायू हा तत्काळ मनुष्याला लुळा करतो. क्षय हा कालांतराने ठार मारतो. असा पोक्त विचार करून या मालवा शीखांनी क्षयरोग पत्करण्याचे ठरवून इंग्रजांचा आश्रय घेतला. त्यांनी तत्काळ आपला वकील मेटकाफ याला महाराजांकडे धाडले व मागून सैन्य धाडले. ब्रिटिशांचे सामर्थ्य महाराज जाणून होते. त्यामुळे सर्व आयुष्याचे स्वप्न धुळीस मिळणार हे दिसत असून, मालवा शीखांचा पराकाष्ठेचा संताप आला असून त्यांनी मन विकाराधीन होऊ दिले नाही व १८०९ साली सतलज ही आपली दक्षिण सरहद्द, हे मान्य करून तसा इंग्रजांना तहनामा करून दिला. अशा रीतीने शीख स्वराज्याचे, एकछत्री शीख राज्याचे साकार होत आलेले त्यांचे स्वप्न कायमचे भग्न झाले. ते कोणामुळे ? शीख मिसालदारांमुळे ! गुरू नानक, गुरू गोविंदसिंग यांचा धर्म हा शीखांना संघटित करू शकला नाही !
 प्रश्न असा येतो की यात सनातन हिंदुसमाजापेक्षा निराळे काय झाले ?

कर्ते पुरुष :
 मालवा शीखांनी धर्मद्रोह करून इंग्रजांशी हातमिळवणी केली व महाराज रणजितसिंग यांचे स्वप्न धुळीस मिळविले तरी महाराज हताश होऊन स्वस्थ बसले नाहीत. वायव्येकडे साम्राज्यविस्ताराला अजून खूप अवसर होता. तिकडे आपले शक्तिसर्वस्व खर्चून मुस्लीम सत्तांपासून तो प्रवेश मुक्त करावयाचा, असे त्यांनी ठरविले. सतलजच्या उत्तरेच्या सहा मिसलींवर त्यांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले होते तरी कसूर, मुलतान ही सिंधूच्या पूर्वेची ठाणी आणि डेरागाझीखान, डेरा इस्माइलखान ही पश्चिमेची ठाणी अजून मुस्लीम नवाबांच्या ताब्यात होती. वायव्य सरहद्दीचा पेशावर प्रांत आणि काश्मीर यांवर तर त्यांचेच राज्य होते. हा सर्व प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करण्याचे ठरवून १८०९ नंतर महाराज त्या उद्योगाला लागले. त्यांच्या कर्तृत्वाचा हा विशेष की, दिवाण मोकमचंद, हरिसिंग नलुआ, बाबा फुलासिंह, मिश्री दिवाणचंद, अमरसिंह, रामदयाळ, दिवाण मोतीराम, फकीर अजिजुद्दिन यांसारखे सेनापती, कारभारी व मुत्सद्दी त्यांनी आपल्याभोवती निर्माण केले. आजपर्यंत कोणत्याही शीख