पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

भग्न झालेला असल्यामुळे त्याला भवितव्य असे काहीच नव्हते. आणि याच वेळी महाराजा रणजितसिंगाचा उदय झाला नसता तर शीखांचे मागले कर्तृत्व हे तरी इतिहासविषय झाले असते की नाही, याची शंकाच आहे. एक धार्मिक संप्रदाय म्हणून फारतर इतिहासाने त्याची नोंद केली असती. पण भारताच्या, हिंदूंच्या आणि शीखांच्या सुदैवाने महाराजा रणजितसिंगासारखा एक थोर, कर्ता, संघटना कुशल असा नेता पंजाबला लाभला आणि त्यामुळे त्या प्रदेशाचे भवितव्य उजळून निघाले.

शीखांचे एकछत्र :
 महाराजा रणजितसिंग यांचा जन्म इ. स. १७८० साली गुजराणवाला येथे झाला. बारा मिसलींपैकी शुकरचाकिया या मिसलीचा संस्थापक चरणसिंग याचा रणजितसिंग हा नातू. त्याच्या वडिलांचे नाव महानसिंग. ते १७९२ साली वारले. पुढील पाच वर्षे शुकरचाकिया मिसलीचा कारभार त्याची आई राजकौर हिने पाहिला. १७९७ साली महाराजांनी आईला व दिवाण लखपतराय यांना बाजूस सारून सर्व कारभार आपल्या ताब्यात घेतला. प्रारंभापासूनच सर्व शीखांचे एकछत्री राज्य निर्मावयाचे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. झमानशहाला निश्चयाने प्रतिकार केला असेल तर तो त्यांनीच. पण त्या वेळी बारांपैकी एका मिसलीचा एक तरुण प्रमुख सरदार येवढीच त्यांची प्रतिष्ठा होती. १७९९ साली झमानशहा परत गेल्यानंतर महाराजांनी आपल्या अंगीकृत कार्याला प्रारंभ केला आणि पुढील दहा वर्षांत साम-दाम-दंड-भेद या उपायांनी बहुतेक सर्व मिसली विलीन करून त्यांनी पंजाबवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. हे कार्य सुखासुखी झाले नाही. काही मिसालदारांनी कसूर, मुलतान येथील मुस्लीम खानांची मदत घेऊनसुद्धा महाराजांशी लढा केला. पण महाराजांनी आपल्या शौर्याने, राजनीतीने, संघटन कौशल्याने सर्वांना जेर केले व सतलजच्या उत्तरेच्या व दक्षिणेच्याही मिसली जिंकून शीखांचे एकछत्र निर्माण केले. आणि स्वधर्म व स्वराज्य यांच्या अभेदाचे महातत्त्व शीखांच्या ठायी रुजले असते तर शीखांचे हे स्वराज्य दुर्भेद्य होऊन कदाचित त्याचे साम्राज्यातही रूपांतर झाले असते. पण सतलजच्या दक्षिणेचे पतियाळा, नाभा, झिंद येथले शीख सरदार धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांपासून सर्वस्वी अलिप्त होते. त्यांनी रणजितसिंगा-