पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२०३
 

कलह, संघर्ष हेच शीख मिसलींचे लक्षण झाले आणि अराजक, विघटना व अधःपात यांत त्याची परिणती झाली." (खंड ३ रा- पृ. ३३)
 अशा धर्मभ्रष्टतेमुळे व विघटनेमुळे शीखसमाज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बलशाली होण्याऐवजी उत्तरोत्तर क्षीणबलच होत गेला. अबदालीचा नातू झमानशहा याच्या स्वाऱ्यांनी शीखांचे हे दौर्बल्य अगदी उघडे केले. १७९७, व १७९९ या साली त्याने स्वाऱ्या केल्या त्यावेळी शीखांना आपली सत्ता दृढ करण्यास पुरी तीस वर्षे मिळाली होती. पण त्यांच्यात तर यादवीचे थैमान चालू होते. विघटना पराकोटीला गेली होती. त्यामुळे दोन्ही स्वाऱ्यांत झमानशहाने थेट लाहोरपर्यंत येऊन पंजाबची ती राजधानी दोन्ही वेळा लुटून नेली व जाळून विध्वंसून टाकली. अबदालीच्या वेळेप्रमाणेच शीख याही वेळीं वनवासी झाले व गिरिकंदरात गेले ! तीस वर्षांत त्यांच्यांत कसलीही प्रगती झाली नव्हती. त्यावेळी मंझाशीखांपैकी अबदालीच्या बाजूला कोणी गेले नव्हते. यावेळी अनेकांनी तोही धर्मद्रोह केला. प्रगती झाली ती अशी !

हिंदूंप्रमाणेच :
 या झमानशहाच्या वेळच्या भारतातील हिंदूंच्या व मुसलमानांच्या वृत्ती लक्षिण्याजोग्या आहेत. झमानशहा येणार हे कानी येताच अखिल भारतातले मुस्लीम त्याच्या स्वागतार्थ सिद्ध झाले. कसूरचा निजामुद्दिन, रोहिले, अफगाण, अयोध्येचा वजीर, म्हैसूरचा टिपू, आणि दिल्लीचे काही सरदार यांनी स्वारी करून येण्याची त्याला निकड लावली. भारतातला प्रत्येक मुस्लीम तयमूरच्या वंशजाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची भाषा बोलू लागला. तो आपल्या धर्माचा संरक्षक आहे अशी त्यांची भावना होती. (हिस्टरी ऑफ दि सीखस्, हरिराम गुप्ता, खंड ३ रा. पृ. ६४-६५) यावेळी 'शरबत खालसा' ही अखिल शीखांची सभा भरली होती. 'रानावनात निघून जावे,' असा ठराव सभेत संमत झाला. अनेक रजपूतराजे व मालवा शीख तर झमानशहाला जाऊन मिळालेच होते ! हिंदुधर्म हा हिंदूंचे संघटनतत्त्व कधीच होऊ शकला नाही. दुर्दैवाने शीखधर्माची तीच स्थिती झाली. यावेळी झमानशहाला प्रतिकार केला तो एकाच शक्तीने. ती शक्ती म्हणजे रणजितसिंग !
 शीखसमाज स्वार्थ, सत्तालोभ, धर्मभ्रष्टता, अराष्ट्रीय वृत्ती यांनी असा शतधा