पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

म्हणतात, 'जमात—संस्कृतीतून वारशाने आलेले विघटित वृत्तीचे, दुहीचे जे रक्तातले संस्कार त्यांवर शीखधर्म जय मिळवू शकला नाही व आजही मिळवू शकत नाही.' (कित्ता)
 १७२० ते १७६९ या काळात मंझा शीख विघटित होते. तरी त्यांच्या ठायी धर्मनिष्ठा, त्यागबुद्धी, प्राणार्पणाची सिद्धता हे गुण जिवंत होते. पण पुढच्या १७६९ ते १७९९ या कालखंडात त्यांचा फारच अधःपात झाला. शत्रू निःशेष होताच त्यांच्यातील ध्येयवाद संपुष्टात आला आणि धनलोभ व सत्तालोभ हे प्रबळ झाले. पंजाबात शीखांच्या बारा स्वतंत्र सत्ता- मिसली- स्थापन झाल्या. यातील प्रत्येक मिसल दुसरीवर धाड घालून शीखांचे रक्त सांडू लागली.

अधःपात :
 प्रा. हरिराम गुप्ता यांनी आपल्या 'हिस्टरी ऑफ शीखस्' या ग्रंथाच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडात शीखसमाजाच्या यादवीच्या वृत्तीवर, दुही, फुटीरपणा, विद्वेष, धर्मलोप, ध्येयशून्यता यांवर फार कडक टीका केली आहे. पहिल्या खंडात त्यांनीच शीखांच्या पराक्रमाचा गौरव केला असल्यामुळे या टीकेला महत्त्व आहे. ते म्हणतात, "या काळात शीखसमाजाची सर्व शक्ती यादवीत खर्च होत होती. शीखांच्या मिसलींची स्थापना लोकशाहीतत्त्वावर झाली होती. अशा स्थितीत एक प्रबळ लोकसत्ताक राष्ट्र पंजाबात स्थापन करण्यासाठी पाया सिद्ध झाला होता आणि ते त्यांनी स्थापन केले असते तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे जसे पश्चिमेस तसेच हे लोकसत्ताक पूर्वेस भूषणभूत झाले असते. पण वॉशिंग्टन एकच होता. आणि तो व त्याचे सहकारी हे कायदा, स्वातंत्र्य व स्वजनप्रेम या निष्ठांनी प्रेरित झाले होते. उलट शीख स्वार्थ, अहंकार व राज्यविस्तार यांनी प्रेरित झाले होते. त्यामुळे पंजाबात वॉशिंग्टन- सारखा नेता किंवा त्याच्यासारखी राष्ट्रीय वृत्ती निर्माण झाली नाही. (चॅथॅम- सारखा पुरुष भारतात त्याकाळी निर्माण होणे शक्यच नव्हते हे शेजवलकरांचे मत मागील लेखात सांगितले आहे. येथे वाचकांनी त्याचे स्मरण करावे.) जनहितात स्वहित विलीन करण्याऐवजी प्रत्येक माणूस स्वहित हे ध्येय मानू लागला व अशा रीतीने शीखांनी गुरूंच्या समतेच्या कल्पनेचा विपर्यास केला. गुरूंच्या सर्वच धर्मतत्त्वांना शीखांनी विकृत रूप दिले. त्यामुळे स्पर्धा, मत्सर,