पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
२०१
 

आले नाही. शेवटपर्यंत ते लुटारू पेंढारीच राहिले. पुढील काळात महादजी शिंदे यांनी इंग्रजांविरुद्ध मराठा- शीखांची एक आघाडी करण्याचा प्रयत्न केला. दोघांत तहनामाही झाला. पण शीखांनी तो पाळला नाही. त्यांनी उलट इंग्रजांशीच सहकार्य केले. 'हा परका मनुष्य (महादजी) आमच्या देशात घुसला आहे. तो सर्वनाश करील. अशा वेळी आमच्याशी स्नेह जोडावा अशी आपली इच्छा असेल तर आम्ही आपलेच आहो' असे इंग्रजांना त्यांनी कळविले. महादजींनी त्यांना लिहिले होते की 'इंग्रज हा तुमचा, आमचा, सर्वांचा शत्रू आहे. म्हणून वेळीच उपाययोजना करणे आपल्या हिताचे आहे.' पण याचा काही उपयोग झाला नाही. (राइज् ऑफ दि सिख पॉवर; प्रकरण ६ वे- पृष्ठे १३७,१४५,१४७,१८२)

संधी घालविली :
 मंझा व मालवा शीख दोघेही खालसाचेच अनुयायी होते. पण मुस्लीम सत्तेच्या लढ्यात ते संघटित होऊ शकले नाहीत. मंझा शीख ४०-४५ वर्षे लढत राहिले. पण तेही आपले सामर्थ्य संघटित करू शकले नाहीत. तसे त्यांनी केले असते तर दिल्लीला शीखसत्ता तेव्हाच प्रस्थापित झाली असती आणि अबदालीच्या स्वाऱ्यांचा संभवच नष्ट झाला असता. सर जोगेन्द्रसिंग म्हणतात, "या शीख टोळ्यांना एकमुखी नेतृत्व निर्माण करून संघटना करता आली नाही. ते कोणत्याही नाईकाशी एकनिष्ठ रहात नसत. त्यामुळे सर्व पंजाबचे ऐक्य करून स्वराज्य व सुराज्य स्थापन करण्याचे आपले ऐतिहासिक कार्य ते करू शकले नाहीत. सर्व शीखांची अभंग निष्ठा स्वतःच्या ठायी खेचील असा नेता त्यांना मिळाला असता तर भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले असते. पण गुरू गोविंदांनी निर्माण केलेले ऐक्यबंध तोडून खालसासमाज भग्न झाला. त्याच्या अनेक फळ्या झाल्या, शकले झाली. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊन ते अबाधित राखण्याच्या व त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला वैभवसंपन्न करण्याच्या कार्यात शीख यश मिळवू शकले नाहीत. भारताला संघटित करण्याची संधी खालसाला आली होती. पण ती त्याने घालविली." (हिस्टरी ऑफ दि सीख्स्. खंड २ रा- प्रा. हरिराम गुप्ता प्रस्तावना- जोगेन्द्रसिंग) 'आजचा विसाव्या शतकातील शीख असाच विघटित आहे,' असे सांगून जोगेन्द्रसिंग