पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

काळ गणला जातो. पंजाब विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. हरिराम गुप्ता यांनी तीन खंडांत 'हिस्टरी ऑफ दि सिख्स्' हा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील पहिला खंड १७३९- १७६८ या काळाविषयीचाच आहे. त्यांनी त्यात शीखांच्या पराक्रमाचा खूपच गौरव केला आहे. कलकत्ता विद्यापीठाचे डॉ. नरेंद्र कृष्ण सिन्हा यांनी आपल्या 'राइज ऑफ दि सिख पॉवर' या पुस्तकातही शीखांचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे शीखांचा तो गौरव सार्थच आहे. पण याहीपलीकडे जाऊन समाजसंघटनेच्या दृष्टीने विचार करता, असे दिसते की, याही काळात शीख आपले बल संघटित करू शकले नव्हते. कपूरसिंग, जसासिंग असे जरा समर्थ नेते त्यांना मिळत तेव्हा काही टोळ्या एकमेकीत विलीन होत. आणि असे होता होता स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस शीखांच्या बारा टोळ्या राहिल्या. त्यांना मिसली म्हणत. हे सर्व शीखच होते. पण ते एकमुखी संघटना संग्रामकाळीही निर्माण करू शकले नाहीत.

संघटना नाही :
 याचा अर्थ असा की 'खालसा धर्म' हे शीखांचेही संघटनतत्त्व होऊ शकले नाही. याचे एक स्पष्ट प्रमाण असे की सतलजच्या दक्षिणेचे शीख हे स्वातंत्र्य- संग्रामातही सहभागी झाले नाहीत. सतलजच्या उत्तरेच्या शीखांना मंझा शीख व दक्षिणेच्या शीखांना मालवा शीख म्हणतात. मंझा शीख अबदालीशी लढत असताना पतियाळाचा अल्लासिंग त्याला शरण गेला व पुढे तर तो अबदालीचा सहकारीच झाला. पुढील काळी अबदालीचा नातू झमानशहा स्वारी करून आला तेव्हा पतियाळाच्या साहेबसिंगाने जबरदस्तापुढे नमण्याचे कुलव्रत तसेच चालू ठेविले. (रणजितसिंगाचे चरित्र- लेखक कुशावतसिंग, पु. २८,३१) नरेंद्र कृष्ण सिंह म्हणतात, 'मालवा शीख अंतर्वेदीत नित्य लूटमार करीत, वरचेवर मोहिमा काढून जाळपोळ, विध्वंस करीत, पण ही केवळ दरोडेखोरी होती. त्याच्यामागे राष्ट्रीय भावना मुळीच नव्हती. अबदालीशी लढणारे मंझा शीख काही उच्च भावनेने प्रेरित झाले होते. तसे मालवांचे काही नव्हते. अंतर्वेदीत प्रभुत्व नजीबखान रोहिल्याचे होते. त्या प्रदेशात वर्षानुवर्ष लूटमार करून त्यांनी नजीबला नामोहरम करून टाकले. पण हे मालवा शीख कधी ऐक्य करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वकीय शासन असे कधीच निर्माण करता