पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१९९
 

पुन्हा कोणी कर्तबगार सरदाराने मोहीम काढली की कडेकपारीत नाहीसे होत.

वनवास :
 चाळीसपन्नास वर्षे शीखांनी हा जो लढा चालविला त्याला भारताच्या इतिहासात खरोखर तोड नाही. धर्मासाठी एवढे घोर बलिदान फार थोड्या जमातींनी केले असेल. झकेरियाखान, मीर मन्नू, सादिक यांनी केलेल्या हत्याकांडाची वर्णने वाचताना सारखे मनात येत असते की दुसरी कोणतीही जमात पहिल्या मोहिमेतच गारद झाली असती व शरणागती पत्करून तिने कायमचे दास्य स्वीकारले असते. पण गुरू गोविंदसिंगांनी दिलेली क्षात्रधर्माची शिकवण, बंदाबहाद्दराच्या पराक्रमामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास आणि गुरू नानकांच्या धर्मावरील अचल श्रद्धा यामुळे शीखांत काही अद्भुत बळ संचरले होते. त्यामुळे केवढाही भयंकर संहार झाला, कसल्याही यमयातना सोसाव्या लागल्या, रानावनात, गिरिकंदरात कितीही कष्टाचे जीवन कंठावे लागले तरी शीख दबले नाहीत. जरा संधी सापडताच ते पुन्हा उसळून येत व मुस्लीमसत्तेवर सर्व सामर्थ्य एकवटून आघात करीत.

स्वातंत्र्य :
 चाळीसपन्नास वर्षे असा लढा चालवून १७६८-६९ च्या सुमारास शीखांनी पंजाब स्वतंत्र केला. अबदालीने पुन्हा हिंदुस्थानवर स्वारी केली नाही. आणि दिल्लीच्या सुभेदारांचाही दम उखडला होता. त्यामुळे शीखांनी आक्रमकांशी चालविलेला लढा समाप्त होऊन शीखांचे नष्टचर्य संपले. यामुळे शीखांच्या सत्तेविषयी पंजाबी जनतेच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. शीखसत्ता पंजाबात प्रस्थापित होऊन आपलेही नष्टचर्य संपेल व सुखशांतीचे दिवस आपल्याला लाभतील अशी आशा तिला वाटू लागली. पण या अपेक्षेचा संपूर्ण भंग झाला. कारण सर्व पंजाब हाती आला असूनही शीखांना तेथे एकमुखी केंद्रसत्ता प्रस्थापित करता आली नाही. स्वातंत्र्यलढा चालू असतानाही शीखांना एकमुखी नेतृत्व निर्माण करता आले नव्हते. त्यांच्या निरनिराळ्या पासष्ट टोळ्या सर्व पंजाबभर संचार करीत आणि स्वतंत्रपणेच लूटमार करीत. त्याकाळीही शीख- जमातीत शिस्त अशी काही नव्हती. स्वातंत्रलढ्याचा काळ म्हणजे मोठा गौरवाचा