पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

 या काळात दिल्लीचे बादशहा अत्यंत नादान व दुबळे असून त्यांचे वजीर त्यांच्यापेक्षाही कर्तृत्वशून्य होते. पण या काळातले पंजाबचे सुभेदार झकेरियाखान, मीर मन्नू, आदिनाबेग व सादिक यांसारखे सरदार हे कर्तबगार होते. त्यांनी शीखांचा संहार करण्यात आपले शक्तिसर्वस्व वेचले. शिवाय याच काळात अहमदशहा अबदालीने पंजाब- दिल्लीवर आठ स्वाऱ्या केल्या. नजीबखान रोहिल्यासारखे सरदार त्याला वारंवार आमंत्रणे देत आणि त्याला सर्वतोपरी साह्य करीत. मोगलांनी १५२६ साली अफगाणी पठाणांची सत्ता नष्ट करून तेथे आपले राज्य स्थापिले. पण पठाणांनी पंजाब हा आपला आहे ही भावना कधीच विस्मृतीत जाऊ दिली नाही. अबदालीने इतक्या स्वाऱ्या केल्या त्याच्या मागे पंजाबचे गेलेले राज्य परत मिळवणे, हीच आकांक्षा होती. पहिल्या स्वारीतच त्याने लाहोर जिंकून तेथे आपला सुभेदार नेमला. आणि त्या सत्तेवर शीख सतत आघात करीत राहित्यामुळेच अहंमदशहा वारंवार हिंदुस्थानवर चालून येत होता. तेव्हा दिल्लीची पातशाही जरी क्षीण व निर्बल झाली असली तरी मुस्लीमवर्चस्वाचा जोर कमी झाला नव्हता. त्यामुळे शीखांना या स्वातंत्र्यसंग्रामात फार मोठे अग्निदिव्य करावे लागले.
 फरुकसियर १७१९ साली मेला. त्यानंतर दिल्लीला बंडाळ्या माजल्यामुळे पंजाबच्या शासनात जरा ढिलाई आली. त्याबरोबर शीखांनी उचल करून शीखांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले आणि लाहोरच्या सुभेदाराने पाठविलेल्या, फौजांचा मोड केला. याच सुमाराला झकेरियाखान हा लाहोरचा सुभेदार झाला व त्याने पुन्हा हत्याकांड सुरू केले. तो व त्याचे अधिकारी शेकडो शीखांना पकडून आणीत आणि लाहोरच्या दिल्लीवेशीजवळ त्यांची कत्तल करीत. त्यामुळे त्या जागेला शहीदगंज असेच नाव पडले होते. अशी घोर कत्तल सुरू होताच शीख घरादारांचा त्याग करून वनवासात गेले आणि डोंगरदऱ्यांत राहून तेथून सरकारी रसद व खजीना यांवर हल्ले चढवून त्यांची लुटालूट करू लागले. पुढच्या चाळीस वर्षांचा शीखांचा इतिहास असा आहे. दिल्लीच्या पातशाहीचे सुभेदार मोठमोठ्या फौजा घेऊन शीखांच्या शिकारीस बाहेर पडत आणि हजारो शीखांना ठार करीत. अशा वेळी शीख घरेदारे सोडून अरण्यात जात आणि मोगलांच्या मोहिमा ढिलावल्या की पुन्हा परत येत, आपल्या लहानमोठ्या टोळ्या पुन्हा उभ्या करीत आणि सर्वत्र लांडगेतोड करीत.