पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

दुसरीची ती आदित्य! या कश्यपाने प्रजापतीच्या बारा कन्यांशी विवाह केला होता आणि त्यांपासून त्याला प्रजा झाली ती कोणती ? नाग, सर्प, गरुड, राक्षस, अप्सरा! या कथेचा स्पष्ट अर्थ असा की या नावाच्या सर्व जमाती एक तर मुळातच एक रक्ताच्या होत्या किंवा आर्यांनी या कथा निर्माण करून आपण सर्व एकवंशीय आहो अशी भावना सर्वांच्या ठायी बुद्धिपुरस्सर निर्माण केली होती. सुर आणि असुर यांच्यातील भेद असाच मनोरंजक आहे. आज असुर याचा अर्थ राक्षस, दैत्य, अत्यंत क्रूर, हिंस्र, रानटी लोक असा होतो. वेदांत या शब्दाचा हा अर्थ आहे. पण दुसराही याच्याबरोबर उलट, असाही अर्थ आहे. असुर म्हणजे परमात्मा, देवाधिदेव, असा अर्थ वेदांत सापडतो. इंद्र, वरुण, अग्नी यांनाही वेदांत असुर म्हटले आहे. शाल्व हे दैत्य होते असे महाभारतात वर्णन आहे. पण याच शाल्व घराण्यातला द्युमत्सेन-पुत्र सत्यवान हा सावित्रीचा पती होता. सत्यवान या दानवाचे, सूर्याप्रमाणे तेजस्वी, बृहस्पतीसारख्या बुद्धिमान इंद्रासारखा सामर्थ्यवान व पृथ्वीसारखा क्षमाशील, असे नारदांनी वर्णन केले आहे. आणि या दानवाला वरणारी शिबिकुलातली सावित्री तर भारतवर्षात आदर्श पतित्रता मानलेली आहे. तीही दैत्य कुलातली होती. (महाभारत, आदि० अ. ६७, श्लोक ८, १७- अश्वपति व द्युमत्सेन हे याच शिवी व शाल्व कुळातले होते की नाही याविषयी वाद होणे शक्य आहे. पण ही दोन कुळे मूळची दैत्य होती असे या श्लोकांत स्पष्ट म्हटले आहे.)
 आस्तीक हा जरत्कारू या तपःसामर्थ्यवान, महातेजस्वी अशा ब्राह्मणाचा नुलगा. त्याचेही वर्णन तपस्वी, वेदवेदांगामध्ये पारंगत, महात्मा, असे महाभारतात केलेले आहे. पण तो एका नागकन्येचा पुत्र होता. वासुकी या नागराजाची भगिनी जरत्कारू हिच्याशी या ब्राह्मण जरत्कारुने विवाह केला होता. तिचाच हा पुत्र होय. नागकुलोपन्न असूनही आस्तीक हा त्या काळापासून आजपर्यंत श्रेष्ठ आर्य गणला गेलेला आहे. तेव्हा सत्यवान व सावित्री यांना ते दैत्य असूनही आर्यांनी आदर्श पतिपत्नी मानले असले तर नवल नाही. कारण आर्यत्व हे गुणांवर, चारित्र्यावर अवलंबून होते, वंशावर नव्हते. आणि तसे पाहता देव आणि दैत्य यांचा वंश एकच होता. प्रल्हाद हाही दैत्यच होता. पण 'प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम्' असे म्हणून गीतेत त्याला श्रेष्ठ पदवी, आर्यत्व दिलेच आहे. सौति हा रोमहर्षणाचा पुत्र. हा रोमहर्षण सूत जातीचा होता.