पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

चढ्या जोमाने शीखनिःपाताची मोहीम चालू केली. शेवटी गुरुदासपूर किल्ल्यात अन्नपाण्यावाचून हाल होऊन शीख सेना मरू लागली; तेव्हा बंदाने बाहेर पडून अफाट मोगलसेनेवर चालून घेतले. अर्थातच तो पकडला गेला. त्याचे पाचशे सैनिकही त्याच्याबरोबर पकडले गेले. सर्वांना दिल्लीला नेऊन अतिशय विटंबना व हाल करून ठार मारण्यात आले. कत्तलीपूर्वी प्रत्येकाला, मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल, असे सांगण्यात आले. पण एकानेही धर्मत्याग केला नाही. सर्वांनी स्वधर्मे निधनच श्रेयस्कर मानले. आणि अशा रीतीने जिवंतपणी जसा त्यांनी अद्भुत इतिहास केला तसेच मृत्यूतही एक अत्यंत तेजस्वी पर्व रचून ठेविले.

परंपरा नाही :
 वीर बंदावैरागी याच्या चरित्राचा विचार करू लागताच वर सांगितलेला विचार पुनः पुन्हा मनात येतो. त्याच्यासारखे पाच- सहा शूर सेनापती व सरदार गुरू गोविंदसिंगांना मिळाले असते तर पंजाबात त्याच वेळी स्वराज्यस्थापना झाली असती. आणि मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य आठ-पंधरा वर्षांत समूळ नष्ट झाले असते. पण गुरुगोविंदांना असा एकही सेनापती मिळाला नाही. एकटा बंदा बैरागी गुरूंच्या मदतीला असता तरीसुद्धा पुष्कळ कार्यभाग झाला असता. पण गुरूंच्या निधनानंतर त्याची कारकीर्द सुरू झाली. आणि तोही पुन्हा एकाकीच होता. त्याच्या काळीही शीखसमाजात मोठे कर्ते पुरुष निर्माण झाले नाहीत. दुसरी गोष्ट शीखांच्या दुहीची. सर्व शीख त्याला मिळाले नाहीत. खालसा पंथ मनापासून त्याच्या मागे उभा राहिला नाही. बंदाचे अनुयायी स्वतःला बंदिया म्हणवीत. स्वतः बंदा याने 'वाहा गुरुजी की फत्ते', 'वाहा गुरू का खालसा' या गुरू गोविंदांनी ठरवून दिलेल्या घोषणा बदलून 'फत्तेधर्म', 'फत्तेदर्शन' अशा घोषणा चालू केल्या. त्यामुळे शीखांत आणखी फूट पडली. त्याच्यापासून फुटलेले शीख नुसते दूर राहिले असे नव्हे तर ते बादशहा फरुखसियर याच्या सैन्यात सामील झाले. बादशहाने अमृतसरला देणग्या देऊन, सक्तीने धर्मांतर केले जाणार नाही, खालसांकडच्या जहागिरी कायम ठेविल्या जातील, अशी आश्वासने देऊन, अनेक शीखांना फोडले आणि वीर बंदाचे सामर्थ्य खच्ची केले. (गोकुळचंद नारंग, ट्रॅन्सफॉरमेशन ऑफ सिखीझम्).