पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१९५
 

असेल तर बंदा बैरागी याच्या अपवादाने वरील विचाराची सत्यता डोळ्यांत जास्त भरते, असे दिसून येईल. बंदाबैरागी हा मूळचा पंजाबी गृहस्थ. तरुणपणीच काही कारणाने विरक्त होऊन त्याने संसारत्याग केला आणि तो दक्षिणेत येऊन राहिला. तेथे गुरू गोविंदसिंग यांच्या सहवासात आल्यावर त्यांच्यापासून त्याला स्फूर्ती मिळाली. गुरूंनी त्याला शीखपंथाची दीक्षा देऊन पंजाबात धाडले त्याच्याबरोबर आपले पंचवीस शिष्यही त्यांनी दिले व पंजाबातील प्रमुख शीखांना पत्रे देऊन त्यांना बंदाबैरागी यांचे नेतृत्व स्वीकारण्याची आज्ञा केली. बंदा पंजाबात पोचला व त्याने गुरू तेगबहादुर व गुरू गोविंदसिंग यांचे पुत्र यांवर मुस्लीमांनी भयानक अत्याचार करून त्यांचा वध केला याचा सूड घेण्याची आपली आकांक्षा जाहीर केली. गुरू गोविंदसिंगांची आज्ञा, त्यांच्या शिष्यांनी केलेला प्रचार व बंदाचे प्रभावी नेतृत्व यांमुळे बंदा बैरागी याच्याभोवती शीख फार झपाट्याने गोळा झाले व थोड्याच अवधीत शीखांची चाळीस हजार सेना जमा झाली. तिच्या साह्याने पुढील सात-आठ वर्षात बंदा बैरागी याने असे अद्भुत पराक्रम केले की, पंजाबच्या इतिहासात ते अजरामर होऊन राहिले आहेत. बंदाबहादुराचा सगळा रोख सरहिंदकडे होता. तेथील सुभेदार वजीरखान यानेच गोविंदसिंगांच्या पुत्रांना भिंतीत चिणून मारले होते. प्रथम त्याने समाना या सरहिंदजवळच्या ठाण्यावर हल्ला करून ते गाव उजाड करून टाकले. त्याचे पराक्रम ऐकून शधोरा, बनोर या गावचे हिंदू त्याच्याकडे धावत आले. तेथे त्यांच्या तरुण मुलींवर भरदिवसा मुसलमान नवाब, काजी बलात्कार करीत व एकंदर हिंदूंचा अनन्वित छळ करीत. बंदाने दोन्ही गावे उजाड करून तेथील मुसलमानांची कत्तल केली. नंतर १७१०, ३० मे रोजी बंदाने सरहिंदवर हल्ला केला व ते शहर धुळीस मिळवून वजीरखानास कापून काढले. यानंतर शीखांना प्रचंड विजय मिळत गेले व थोड्याच दिवसात तीनचतुर्थाश पंजाब बंदाच्या ताब्यात आला. या वेळी दिल्लीचा मोगल बादशहा दक्षिणेत होता. तो त्वरेने दिल्लीस परत आला व बंदाचा व शीखांचा निःपात करण्याचा त्याने दृढनिश्चय करून एक मोठी फौज बंदावर पाठविली. आता मोठ्या बादशाही सेनेशी शीखांची गाठ पडली आणि युद्धातले चढउतार सुरू झाले. शीखांना अजूनही मोठे विजय मिळत होते, पण त्यांचे सामर्थ्य कमी पडत आहे हे आता स्वच्छ दिसू लागले. बहाद्दुरशहा मरण पावल्यावर १७१२ साली फरुखसियर गादीवर आला. त्याने