पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

यांच्यांत या बाबतीत केवढे जमीनअस्मानचे अंतर दिसते पहा. औरंगजेब मोगल बादशाहीच्या सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता. त्या वेळी शिवछत्रपती दिवंगत झाले होते. आणि काही काळाने संभाजीमहाराजही मृत्युमुखी पडले. पण त्यानंतरच्या १८ वर्षांच्या काळात, मोठा नेता नसतानाही, मराठ्यांनी मोगलशाहीशी लढा देऊन तिलाच खिळखिळी करून टाकली व आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. उलट पंजाबापासून या वेळी मोगली सामर्थ्य फार दूर गेले होते. मागे उरले होते ते दुय्यम तिय्यम दर्जाचे सरदार. पण औरंगजेबाने हजारो मैलांवरून केवळ पत्रे लिहून त्यांना कार्यप्रवण केले व शेवटी त्यांनीच शीखस्वराज्यस्थापनेचा संभव नष्ट करून टाकला. शीखसमाजाला हिंदुसमाजात तर नाहीच, पण आपल्या संप्रदायातही विपुल संख्येने कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा काळ अवघा तीसपस्तीस वर्षांचा होता. पण तेवढ्या अवधीत तान्हाजी, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, मोरोपंत, मुरारबाजी, बाजीप्रभू, बाळाजी आवजी, अण्णाजी दत्तो, रघुनाथपंत हणमंते, मायनक भंडारी, कान्होजी आंगरे असे किती तरी स्वतंत्र कर्तृत्वाचे पुरुष त्यांनी निर्माण केले. त्यांच्यानंतर ही स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, धनाजी, संताजी, खंडो बल्लाळ ही पिढी महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यानंतर मध्यंतरी ही परंपरा खंडित होते की काय असा क्षण आला होता. पण त्या वेळी पेशव्यांचा उदय झाला. आणि बाजीराव, नानासाहेब यांनी तर अखिल भारताच्या मुक्ततेला पुरे पडेल असे कर्तृत्व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, पटवर्धन, फडणीस, फडके यांच्या रूपाने निर्माण केले. शीखसमाजाला असे विपुल कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत. गुरू गोविंदसिंग हे शीखांतले सर्वात श्रेष्ठ पुरुष. पण प्रारंभापासून अखेरपर्यंत ते एकटेच होते. त्यांच्या नावाचा जयजयकार करीत आनंदपूरहून दशदिशांना शीख सेनापती व सरदार मोहिमांवर जाऊन फत्ते करून येत आहेत असे महाराष्ट्राप्रमाणे पंजाबात कधी घडलेच नाही. त्यामुळे शीखांचा इतिहास वाचताना, स्वतंत्र राज्यस्थापनेचा संभव कोठे निर्माण झालेला या काळात दिसतच नाही. कारण पंजाबी कर्तृत्वाला धुमारे फुटत आहेत असे त्यात कधी आढळून येत नाही.

बंदाबैरागी :
 अपवादामुळे मूळ सिद्धान्त निश्चित सिद्ध होतो, असे म्हणतात. त्यात तथ्य