पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१९३
 

तत्त्वे उपदेशिली. पण ती शीखसमाजापुरतीच राहिली. शिवसमर्थांनी अखिल महाराष्ट्र जागृत केला होता. तसा शीखांना पंजाब जागृत करता आला नाही. याचे एक कारण असे दिसते की, शीखसंप्रदाय हिंदुसमाजापासून फुटून निघाला होता. पंथाला किंवा संप्रदायाला स्वतंत्र अस्मिता आणण्यासाठी पंथाचे म्हणून काही विशिष्ट आचार, विशिष्ट गणवेश आणि काही भिन्नतादर्शक चिन्हे ही अवश्य असतात. पण त्यामुळे, हे लोक आपले नव्हेत, असे सर्व समाजाला कधीही वाटता कामा नये. रामदासी संप्रदायाने आपल्यासाठी स्वतंत्र आचारपरंपरा व गणवेश निश्चित केला होता. पण रामदासी हा हिंदुसमाजापासून वेगळा आहे, असे कधी कोणाच्या स्वप्नातही आले नाही. शीखसमाजाविषयी हळूहळू तशी भावना हिंदुसमाजात निर्माण होऊ लागली. हिंदूंची दैवते, हिंदूंचे अवतार, हिंदूंची तीर्थक्षेत्रे, हिंदूंचे धर्मग्रंथ यांचा शीखगुरूंनी बुद्धिपुरःसर अव्हेर केला. त्यांच्या पूजनास बंदी केली आणि पूर्वपरंपरेचा धागाच अशा रीतीने त्यांनी तोडून टाकला. गुरू गोविंदसिंगांपर्यंत हिंदुसमाजाच्या उद्धाराची भाषा शीखांच्या तोंडी असे. आणि शेवटपर्यंत हिंदुसमाजाचे मित्र व मुस्लीमांचे हाडवैरी अशीच शीखांची भूमिका कायम होती. पण पूर्वपरंपरेचा जाणूनबुजून त्यांनी विच्छेद केल्यामुळे, हिंदुसमाजाचे नेते, अशी भूमिका शीखांना यशस्वीपणे प्राप्त करून घेताच आली नाही. त्यामुळे मुस्लीमांविरुद्ध चालविलेल्या लढ्यात त्यांना अखिल पंजाबची शक्ती आपल्यामागे उभी करता आली नाही, आणि स्वतः शीख अल्पसंख्य पडल्यामुळे त्यांचे बळ तोकडे पडले.

दुही-यादवी :
 अल्पसंख्य असूनही शीखसंप्रदायाचे ऐक्य अत्यंत दृढ व अभंग असते तरीही त्याला यापेक्षा किती तरी पटीने जास्त यश आले असते. पण तसे ऐक्यही शीखसमाज निर्माण करू शकला नाही. येथून पुढचा ८०-९० वर्षांचा म्हणजे महाराजा रणजितसिंग यांच्या उद्यापर्यंत शीखांचा इतिहास हा जितका शौर्य, त्याग, आत्मबलिदान या गुणांचा आहे तितकाच तो दुही, फूट, यादवी या दुर्गुणांचाही आहे. नाही तर अखिल पंजाबची शक्ती मागे नसतानाही शीखांना गुरू अर्जुनसिंग ते गुरू गोविंदसिंग या काळात पंजाबात स्वराज्याची स्थापना निश्चित करता आली असती. पण ते त्यांना जमले नाही. मराठे आणि शीख