पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

पुरवीत होतीच. पण ते तिच्या हाती सापडले नाहीत. पण याच काळात त्यांच्यावर एक भयंकर आपत्ती कोसळली. गंगाराम हा त्यांचा पूर्वीचा शिष्य व स्वयंपाकी. त्याच्याकडे त्यांनी आपल्या मातेला व धाकट्या दोन मुलांना विश्वासाने ठेविले होते. पण त्याने दगा दिला व सरहिंदचा सुभेदार वजीरखान यास गोविंदसिंगांचा हा परिवार आपल्याकडे असल्याची बातमी दिली. खानाने लगेच त्यांना पकडून नेले आणि 'मुसलमान व्हा नाही तर तुम्हांला देहदंड सोसावा लागेल' अशी धमकी दिली. मुलांनी उत्तर दिले की, 'आम्ही गुरू गोविंद यांचे पुत्र आहो. आम्ही मरणाला भीत नाही. पण ध्यानात ठेवा की, आमच्या रक्ताच्या थेंबातून अनेक जोरावर सिंग व फत्तेसिंग उत्पन्न होतील व तुझ्यासारख्या जुलमी मोगलांचा प्राण घेतील.' अर्थातच दोन्ही मुलांना भिंतीत चिणून ठार मारण्यात आले. यानंतर लौकरच औरंगजेब मृत्यू पावला. त्याच्या मागून गादीवर हक्क सांगणाऱ्या बहादुरशहाला गुरू गोविंद यांच्या मदतीची जरूर होती. मुअज्जमशी झालेल्या लढाईत गुरूंनी त्याला खूप मदत केली व त्यामुळेच बहादुरशहाला विजय मिळाला व तो गुरूंचा मित्र बनला. त्याने गुरुजींना लाख मोहरा नजर केल्या व आपल्याबरोबर दक्षिणेत येण्याचा आग्रह केला. गोविंदसिंगांनी तो मान्य करून ते दक्षिणेत नांदेड येथे जाऊन राहिले. तेथून मराठ्यांच्या मदतीने पुन्हा पंजाबात जाऊन तेथे स्वराज्यस्थापना करण्याचा त्यांचा विचार होता, असे म्हणतात. पण एके दिवशी रात्री गुरुजी झोपले असताना दोन पठाणांनी त्यांचा खून केला. त्यांच्या मुलांना भिंतीत चिणून मारणाऱ्या वजीरखानानेच या पठाणांना पाठविले होते. इ. स. १७०८ साली ही दुःखद घटना घडली आणि शीखसमाजाच्या सर्व आशा धुळीस मिळण्याची वेळ आली व खालसा स्वराज्यस्थापना करतील- 'राज्य करेगा खालसा' या गुरूंच्या भविष्यवाणीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला.

मूल्यमापन :
 गुरू गोविंदसिंग या शीख महापुरुषाच्या अखेरीपर्यंत शीखसंप्रदायाच्य कार्याचे स्वरूप येथवर आपण पाहिले. आता त्याच्या त्या कार्याचे थोडे मूल्यमापन करू! या दृष्टीने विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसते की पंजाबातील अखिल हिंदुसमाजात उठाव करण्यात शीखांना यश आले नाही. त्यांनी धर्मक्रांतीची