पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१९१
 

जातिभेदाला त्याने हात लावला नव्हता, की भक्ष्याभक्ष्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्याची सक्ती केली नव्हती. गुरू गोविंदसिंगांनी तो भ्रष्टाकार करून धर्मनाश चालविला होता. म्हणून रजपूत राजे एक झाले होते. पण भंगाणी येथे मोठी लढाई होऊन राजपूत राजांचा पराभव झाला. गुरूंचा असा अनेक वेळा प्रभाव दिसून आल्यावर बरेचसे पहाडी राजे त्यांना वश झाले व ते औरंगजेबाला वार्षिक खंडणी देईनासे झाले. यावेळी औरंगजेब दक्षिणेत असून मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्योगात गुंतला होता. त्याला ही खबर मिळताच, अत्यंत चिडून जाऊन, त्याने आपल्या लाहोरच्या सुभेदाराला खरमरीत पत्रे लिहिली व गुरू गोविंदसिंग यांना जिवंत पकडून आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम दिला. त्या अन्वये अलीफखा, दिलावरखा, रुस्तुमखा अशा अनेक सरदारांनी आनंदपूरवर स्वारी केली. पण त्या सर्वांचा शीखांनी पराभव केला. त्यानंतर बादशहाने शहाजादा मुअज्जम याला मोठी सेना देऊन गुरूवर पाठविले. पण त्याचीही काही मात्रा चालली नाही. तेव्हा औरंगजेबाने पंजाबच्या सर्व सुभेदारांना कडक पत्रे लिहून सर्वांनी मिळून शीखांना जमीनदोस्त करण्याचा हुकूम दिला. या वेळी पहाडी राजपूतही उलट खाऊन मोगल सैन्याला मिळाले. राजपूत व मोगल मिळून एक लाख फौज जमा झाली होती. एवढ्या सेनेने आनंदपूरला वेढा घातला असताना अल्पसंख्य शीखांचा टिकाव लागणे शक्यच नव्हते. त्यातही अन्नाचा तुटवडा पडू लागला. तेव्हा एके दिवशी आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुरू गोविंदसिंग रात्रीचे गुप्तपणे किल्ल्याबाहेर निसटले. मोगलांना याचा सुगावा लागताच त्यांनीही लगोलग त्यांना पकडण्यासाठी फौज धाडली. या धावपळीत निभाव लागणे कठीण आहे, हे पाहून गोविंदसिंग यांनी आपली माता, दोन स्त्रिया व धाकटे दोन मुलगे जोरावरसिंग व फत्तेसिंग यांना एका खेड्यात गंगाराम नावाच्या विश्वासू माणसाकडे धाडून दिले, आणि आपण स्वतः चमकौरच्या किल्ल्यात अजितसिंह व जुझारसिंह या दोन मुलांसह जाऊन राहिले. तेथेही मोगल सेनेने त्यांना घेरले. त्या वेळी त्यांच्याजवळ अवघे ४० शीख होते. कोणाच्या मते ५०० होते. या वेढ्याच्या प्रसंगी अफाट मोगल सेनेवर स्वतः होऊन चालून जाऊन गुरूंच्या दोन पुत्रांनी अभिमन्यूप्रमाणे बलिदान केले. पण चमकौरच्या किल्ल्यातही निभाव लागेना तेव्हा गुरुजी तेथून निसटून गेले व त्यांनी अरण्यवास पत्करला. तेथेही मोगल सेना त्यांचा पिच्छा