पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

पातशाहीला विरोध करण्यापासून काही लाभ आहे, असेही आम्हांला वाटत नाही.' (सिख इतिहास- देशराज ठाकुर, पृ. १८४.)

खालसा :
 एकंदर हिंदुसमाजाची ही मृतावस्था, ही पौरुषहीनता, ही अवकळा ध्यानी घेऊनच गुरू गोविंद यांनी शीख संप्रदायालाच 'खालसा' असे नाव ठेवून, त्यांना काही नवी आचारबंधने लावून त्या पंथात नवे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका सभेत 'धर्मासाठी आत्मबलिदान करण्यास कोण तयार आहेत?' असा सवाल त्यांनी विचारला. आणि जे पाच लोक तयार झाले त्यांना गुरूंनी 'पंचप्यारे' म्हणून संबोधिले. आणि त्यांच्या साह्याने पंथाचे संघटन पुन्हा दृढ करून, त्याला क्षात्रधर्माची दिलेली दीक्षा पुन्हा एकदा उजळण्याचा संकल्प त्यांनी केला. खालसा म्हणजे शुद्ध, पवित्र; खालसा म्हणजे समता, बंधुता; खालसा म्हणजे स्वतंत्र, स्वत्वनिष्ठ ! या खालसा अनुयायांना केस, कडे, कृपाण इ. पाच चिन्हे गुरूंनी आवश्यक म्हणून सांगितल्याचे वर निर्देशिलेच आहे. या सर्वामुळे शीख समाजात नवी शक्ती, नवे चैतन्य निर्माण करण्यात गुरू गोविंदसिंग यांना इतके यश आले की, आज गुरू गोविंदसिंग व शीख संप्रदाय यांत अभेद मानला जातो.

गुरु गोविंदसिंग :
 धर्मजागृतीचे हे कार्य चालू असतानाच गुरूंनी लष्करी सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष पुरविले होते. किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी त्यांचे निवासस्थान जे आनंदपूर त्याच्या भोवतालच्या टापूत लोहगड, फत्तेगड, फूलगड, आनंदगड असे किल्ले बांधले व एक मोठी सेना उभी करण्यासही त्यांनी प्रारंभ केला. त्यांना प्रथम विरोध झाला तो पहाडी राजपूत राजांकडून. आनंदपूर हे एका राजाचे हद्दीत होते. त्याने ती जागा खाली करण्याची गुरूजींना आज्ञा दिली. आणि ती मानली जात नाही असे पाहून वीस-बावीस संस्थानिकांना जमवून त्याने गुरूंवर चाल केली. हे रजपूत राजे औरंगजेबाविरुद्ध असे कधी एकत्र होऊन उठले नव्हते. तो त्यांचा शत्रू नव्हता ! कारण तो फक्त मंदिरे पाडीत असे, हिंदू लोकांना सक्तीने बाटवीत असे व त्यांच्या कत्तली करीत असे. पण