पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१८९
 

शेंडी, जानवे, यांचे आकार कमी होणे यांबद्दल मात्र ते अत्यंत चिंताग्रस्त होते. शीख गुरूंनी हा अधर्म चालविला आहे, भ्रष्टाकार माजविला आहे, असे त्यांना वाटत होते. म्हणून राजा अमेरचंद याच्या नेतृत्वाखाली त्यांचे एक शिष्टमंडळ गुरु गोविंदसिंग यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, 'महाराज, आपण खालसानामक पंथ काढून हे काय चालविले आहे ? यात शिखासूत्राचा विचार नाही, जातिपातीचाही नाही, खानदानीलाही तुम्ही किंमत देत नाही. सर्वांची रसोई एकत्र होते आणि वाटेल त्याच्या हातचे लोक खातात. हे काय आहे ?' हिंदुधर्माचा आत्मा स्वराज्य-स्वातंत्र्यात आहे, स्त्रियांच्या व मंदिरांच्या रक्षणात आहे, सर्व हिंदूंचे संघटन करण्यात आहे, असे त्या रजपूत राजांना मुळीच वाटत नव्हते. शिखासूत्र, उच्चनीचता, भक्ष्याभक्ष्य यांतच तो कोठे तरी आहे अशी त्यांची श्रद्धा होती. मोगलांना मुली देण्यामुळे धर्महानी होते, असा विचारसुद्धा त्यांना शिवत नव्हता. पण इतर हिंदूंबरोबर खाण्यापिण्याने ती होते याविषयी त्यांना शंका नव्हती. गुरू गोविंद सिंग त्यांना म्हणाले, "अरे, तुम्ही ज्याला धर्म म्हणता तो धर्मच नाही. ज्या धर्मात एक माणूस दुसऱ्याला हीन लेखतो तो सर्व समाजाचा धर्म होऊ शकत नाही. माझा प्रयत्न असा आहे की कोणालाही उच्चनीच मानू नये, असे धर्मसंस्कार लोकांवर करावे. राजा, आपल्या देशाची काय अवस्था झाली आहे हे तुला दिसत नाही का ? आपल्या धर्मबांधवांवर कोणते संकट आले आहे आणि तुम्ही स्वतः आपले पूर्ववैभव कसे गमावून बसला आहा, याची तुम्हांला काही कल्पना नाही ? तुम्ही रजपूत आपल्या मुली मोगलांना देऊन त्यांच्या सेवेला हजर राहता. तुमचे धन व तुमच्या कन्या यांवर आपला अधिकारच आहे, असे हे तुर्क समजतात. आणि ते तुम्ही मान्य करता ! तरी तुमच्या अंगी काही क्षात्रत्व आहे असेच मानावयाचे काय ? तुर्कांनी चालविलेल्या घोर अन्यायाचा प्रतिकार करण्याचा उद्योग आम्ही चालविला आहे. पण त्यामुळे तुमच्या धर्मभावना दुखावतात ! हा तुमचा जो धर्म त्याला काय म्हणावयाचे !"
 अर्थात रजपूत संस्थानिकांवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. त्यांनी सर्व राजांची एक सभा घेतली व गुरू गोविंद यांना लिहून धाडले की, 'मोगल बादशहा आज शेकडो वर्षे या देशात राज्य करीत आहेत. त्यांचे राज्य नष्ट करण्यात आपल्याला यश येईल हे संभवत नाही व बलशाली मोगल