पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

इतिहास देऊन ठाकुर देशराज म्हणतात, 'गुरू तेगबहादुर यांच्या या बलिदानाची महती वर्णन करण्याची शक्ती माझ्या ठायी नाही. मी इतकेच सांगतो की, मृतप्राय झालेल्या हिंदुजातीमध्ये यामुळे एक फार मोठे सामर्थ्य निर्माण झाले व त्याने अनेक विजय मिळविले.' (सिख इतिहास- पृ. २२६, २२७, १७३)
 या सामर्थ्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच गुरू गोविंदसिंग होत. पिताजी गेले (इ. स. १६७५) तेव्हा हा मुलगा नऊ वर्षांचा होता. पण तेव्हापासूनच त्याच्या बुद्धीला एक विशेष समज, विशेष प्रौढता आली होती. त्या वेळेपासूनच त्याने पिताजी गुरू तेगबहाद्दुर यांच्या वधाचा बदला घेण्याचे ठरविले होते. पण हा बदला खुनास खून करून त्याला घ्यायचा नव्हता, तर मुस्लीम सलतनतीच्या सामर्थ्याला दुसरे सामर्थ्य भिडवून घ्यावयाचा होता. हे कार्य एक-दोन दिवसांचे नव्हते. त्यासाठी लोकजागृती अवश्य होती. म्हणून प्रारंभीची वीस वर्षे गुरु गोविंदसिंग यांनी मनन, चिंतन व संघटन यांत घालविली. वर सांगितलेच आहे की, शीख समाज या वेळी अगदी अल्पसंख्य असला तरी त्याच्यात दुही, फूट, स्वजनद्रोह, भ्रष्टाचार हे फार माजले होते. गुरुनानक यांनी केलेल्या धर्मक्रान्तीची बीजे पुरतेपणी रुजली नव्हती. म्हणून पुन्हा एकदा त्या धर्मतत्त्वांना उजाळा देणे अवश्य होते. हे जाणून गुरू गोविंदसिंग यांनी ते कार्य प्रथम हाती घेतले.

हा धर्मच नव्हे :
 धर्मतत्त्वांना उजाळा देणे याचा अर्थ काय ते मागील अनेक लेखांत स्पष्ट केलेच आहे. हिंदुधर्माला आलेल्या विकृतीपासून त्याला मुक्त करणे आणि समता, प्रवृत्तिवाद, राष्ट्रभक्ती, बुद्धिनिष्ठा या तत्त्वांचा उपदेश करून ती समाजात दृढमूल करणे याचेच नाव धर्मतत्त्वांना उजाळा देणे असे आहे. शीख समाजात प्रारंभापासूनच जातिभेद, वर्णभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता यांस विरोध होता, सर्व जातीचे लोक त्या पंथात समाविष्ट होत आणि मग त्यांच्यात खाण्यापिण्याचा विधिनिषेध मुळीच पाळला जात नसे, हे मागे सांगितलेच आहे. पंजाबातील पहाडी भागात अनेक क्षुद्र रजपूत राजे व त्यांची क्षुद्र संस्थाने मोगल बादशहांच्या कृपाछत्राखाली सुखाने नांदत होती. त्यांना स्वातंत्र्याशी, स्वराज्याशी काहीच कर्तव्य नव्हते. पण सर्व जातींत समता निर्माण होणे, सर्वांनी एकत्र खानपान करणे,