पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१८७
 

निघाले व प्रयाग, पाटणा, डाक्का या भागांत हिंडून त्यांनी धर्मप्रचार केला. कदाचित याच कार्यात त्यांनी शांतपणे आपले आयुष्य घालविले असते. पण प्रचार करताना मुसलमानांनाही ते शीख धर्माची दीक्षा देत. अर्थातच औरंगजेबासारख्या कडव्या धर्मांध बादशहाला हे सहन होणे शक्यच नव्हते. या वेळी हिंदूंना सक्तीने बाटविण्याची त्याने मोहीमच काढली होती. काश्मीरमध्ये त्याचा सुभेदार शेख अफगाण याने यापायी अनन्वित अत्याचार चालविले होते. तेव्हा तेथील काही ब्राह्मण तेगबहादुर यांचेकडे आले व काश्मीरची सर्व कहाणी त्यांनी त्यांना सांगितली. त्या वेळी गुरूंच्या वृत्तीत एकदम पालट झाला व त्यांनी धर्मासाठी आत्मबलिदान करावयाचे ठरविले. त्यांनी त्या ब्राह्मणांना सांगितले की औरंगजेबाला सांगा की, 'गुरू तेगबहादुरांना तू आधी मुसलमान कर. त्यात तुला यश आले तर मग आम्ही सर्व मुसलमान होऊ.' हा निरोप पोचताच औरंगजेब पराकाष्ठेचा खवळून गेला व त्याने गुरूंना पकडून नेऊन हाल हाल करून ठार मारले.
 गुरू तेगबहादुर यांच्या आत्मबलिदानाची कथा ही शीख इतिहासात अमर झाली आहे. आजही शीखांना ती स्फूर्तिप्रद वाटते. गुरूंच्या बरोबर मतिराम, दयालदास इ. पाच शीखांना बादशहाने पकडून नेले होते. एक दिवस तुरुंगात मतिराम गुरूंना म्हणाले की, 'आपला धर्म रक्षावयाचा तर ही मोगल सल्तनत नष्ट केली पाहिजे.' हे औरंगजेबाच्या कानी जाताच त्याने मतिरामला पकडून दरबारात नेले व त्याला जाब विचारला. मतिराम याने अत्यंत धैर्याने तेथेही जबाब दिला की, 'अरे, ज्यांच्या हृदयात निष्ठा आहे व जे सत्याचे उपासक आहेत ते एकच काय, अनेक मोगल बादशाह्या नष्ट करून टाकतील.' अर्थात् औरंगजेबाने मतिरामला तेथल्या तेथे कापून टाकण्याची आज्ञा दिली. शरीराचे तुकडे होत असतानाही मतिराम अकाल पुरुषाचा जयजयकार करीत होता. याच वेळी दयालदासानेही असेच वीरमरण पत्करले. त्याने औरंगजेबाला सांगितले की, 'तू मतिरामाच्या शिरावर तलवार चालवीत नसून मोगल सल्तनतीच्या शिरावर चालवीत आहेस.' औरंगजेबाने त्यालाही तेलाच्या कढईत घालून ठार मारले. यानंतर गुरू तेगबहाद्दूर यांचाही शिरच्छेद करण्यात आला. मरतेसमयी त्यांनी आपल्या मानेवर एक चिट्ठी गुंडाळून बांधून ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते की, 'सिर दिया, सर न दिया!' शीर दिले पण धर्म दिला नाही. ह