पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
 

तेवढ्यावरुन काहीच ठरत नाही. आर्य हा स्वतंत्र वंश होता हे तर मुळीच सिद्ध होत नाही.
 प्राचीन काळच्या आर्य शब्दाच्या व्याख्या पहा.

कर्तव्यमाचरन् कार्यमकर्तव्यमनाचरन् ।
तिष्ठति प्रकृताचारे स वा आर्य इति स्मृतः ॥

विहित कर्तव्य जो आचरतो, निषिद्ध, निंच आचरण करीत नाही व रूढ शिष्टाचार जो पाळतो त्याला आर्य म्हणावे. ' असा या वचनाचा भावार्थ आहे. ' आर्यत्व हे चारित्र्यावर अवलंबून आहे, धन किंवा विद्या यांवर नाही, असा महाभारतात स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे.
 वृत्तेन हि भव्यत्यार्यो न धनेन न विद्यया । उद्योग - ९०, ५३. तेव्हा आर्य शब्द संस्कृतिवाचक, गुणवाचक आहे, तो वंशवाचक वा वर्णवाचक नाही यात संदेह नाही.
 असे हे आर्य, ज्यांच्यात द्रविड, असुर, नाग, यांचाही निश्चयाने समावेश होतो, त्यांनी आपले वर्चस्व भारतात प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला तेव्हा अर्थातच अनार्य- (यज्ञवेदविरोधी) अशा ज्या जमाती त्यांच्याशी त्यांचा दीर्घकाळपर्यंत संघर्ष झाला. पण अखेरीस या आर्यांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन सप्तसिंधु, पंजाब या प्रांतातून ते हळूहळू चहू दिशांना पसरू लागले व आपली यज्ञसंस्था प्रस्थापून वसाहती करू लागले. आणि कालांतराने आपले सामर्थ्य दुर्जय आहे असा आत्मप्रत्यय येताच त्यांच्यापुढे पहिली समस्या उभी राहिली ती म्हणजे या अखिल भारतीय लोकसमुदायाला एकरूपता कशी आणावी ही. ही सोडविण्यासाठी त्यांनी अनेकविध उपायांची योजना केली आणि वेद, ब्राहाणे, आरण्यके, पुराणे, रामायण, महाभारत हे प्राचीन वाङ्मय पाहता असे दिसते की या कामात त्यांना कल्पनातीत यश आले आहे.

एकवंशीयत्व :
 वर निर्देशिलेल्या प्राचीन वाङ्मयातील वंशोत्पत्तीच्या व इतर वंशविषयक कथा पाहिल्या तर आर्याच्या आर्यीकरणाच्या इतिहासाचा बराच उलगडा होईल. कश्यप हा अत्यंत थोर ब्राह्मण होता. तो मरीचीचा पुत्र व ब्रह्म्याचा पौत्र होय. दिती व अदिती या त्याच्या दोन स्त्रिया. एकीची प्रजा ही दैत्य व