पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

व लांब पहाडात कीरतपूर येथे ते जाऊन राहिले. आणि तयारी करण्यास शीखांना वेळ मिळावा म्हणून काही काळ सबुरीचे, नरमाईचे, धोरण स्वीकारून दहा बारा वर्षे धर्मप्रसाराच्या कार्यात त्यांनी शांतपणे वालविली. त्यांच्यामागून आलेले गुरू हरिराय (१६४५-६१) व गुरू हरकिशन (१६६१-६४) यांच्या कारकीर्दीत विशेष काहीच घडले नाही. त्यानंतर १६६४ साली गुरु तेगबहादुर हे गुरुपदी आले.

तेगबहादुर :
 गुरू तेगबहाद्दुर गादीवर आले त्या वेळी शीख समाजात फार बेदिली माजली होती. गुरू अर्जुन यांच्या बलिदानामुळे तेवढ्यापुरती धर्माभिमानाची लाट समाजात उसळली, पण त्या अभिमानातून दृढ व दीर्घकालीन ऐक्यभावना निर्माण झाली नाही. गुरू अर्जुन यांचा भाऊ पृथिया मोगलांना जाऊन मिळाला होता. गुरूंना तो जन्मभर छळीत राहिला. गुरू हरगोविंद यांच्याविरुद्ध दिल्लीच्या सुलतानांना चिथावण्यात शीख भाईबंदांचा बराच हात होता. अमृतसरच्या मंदिराचे अधिकारी बडवे, पंडे यांच्याच वळणावर गेले. गुरू तेगबहाद्दुर तेथे गेले तेव्हा मंदिराचे दरवाजे त्यांनी बंद करून घेतले व गुरूंनाच आत येण्याची बंदी केली. आणि आश्चर्य असे की गुरूंनी ती मानली व क्षात्रधर्माची दीक्षा देऊन गुरू हरगोविंद यांनी संघटित केलेल्या शीख समाजानेही काही प्रतिकार केला नाही. या पुजाऱ्यांना मसंद म्हणत. मसंद ही एक संस्थाच होती. गुरू अर्जुन यांनी प्रत्येक शीखाने गुरुपीठाला काही दक्षिणा दिलीच पाहिजे, असा दण्डक घालून देऊन त्याच्या वसुलीसाठी ही मसंदसंस्था निर्मिली होती. प्रारंभी काही दिवस ही व्यवस्था ठीक जमली. पण पुढे पुढे हे मसंद इतके भ्रष्ट झाले, दक्षिणेसाठी लोकांना इतके छळू लागले की, गुरू गोविंदसिंग यांना ती संस्था बंद करावी लागली.
 गुरू तेगबहाद्दुर हे अमृतसरहून निघाले ते कीरतपूरला आपल्या वडिलांच्या गावी जाऊन राहिले. तेथेही त्यांचे भाऊ, धीरमल, पुतण्या रामराय व अमृतसरचे मसंद यांनी त्यांना रहाणे अशक्य करून टाकले. रामराय याने तर औरंगजेबाकडून गुरूंना पकडण्याचे हुकूम मिळविले. पण या वेळी हे प्रकरण फार चिघळले नाही. थोड्याच दिवसांत गुरूंची मुक्तता होऊन ते यात्रेला