पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१८५
 

साह्य केल्याचे निमित्तही त्याला मिळाले. त्याने गुरू अर्जुन यांना कैद करून हालहाल करून ठार मारिले. शीख समाजाने धर्मासाठी केलेले हे पहिले बलिदान होय! तेथून ही परंपरा सुरू झाली आणि जवळ जवळ एक शतकभर शीखांनी ती चालविली. या प्रकारच्या आत्मबलिदानातूनच त्या समाजाच्या ठायी मोठी प्रतिकारशक्ती निर्माण झाली.

दिल्लीशी संघर्ष :
 मोगली सत्तेने गुरू अर्जुन यांचा बळी घेतल्याने शीख समाज अत्यंत संतप्त झाला, आणि त्यामुळेच त्यात मोठे परिवर्तन घडून आले. शीखांच्या हे ध्यानात आले की, नुसत्या हरिनामगजराने किंवा ग्रंथसाहेबाच्या पठनाने धर्मरक्षण होणार नाही. आध्यात्मिक उन्नतीसाठीसुद्धा भौतिक लप्करी सामर्थ्य व धन ही आवश्यक आहेत. गुरू अर्जुन यांनी मृत्यूपूर्वी आपला मुलगा हरगोविंद याला हाच संदेश दिला. त्यामुळे गुरुपदी येताच हरगोविंद यांनी आपल्या समाजाला क्षात्रधर्माची दीक्षा देण्याचा निर्धार केला. इतके दिवस शीख समाज केवळ भक्तिमार्गी होता; तो आता शक्तिमार्गी झाला. वारकरी होता तो धारकरी झाला. हरगोविंद यांनी स्वतःचे घोडदळ तयार केले, तोफखाना उभा केला आणि सरळ सरळ लष्करच सज्ज केले. जहांगीरच्या हे कानी जाताच त्याने गुरूंना पकडून कैदेत ठेविले. पण एक दोन वर्षांनी काही लोकांच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली. त्यानंतर शहाजहान गादीवर येईपर्यंत शीखांचा मोगलसत्तेशी संघर्ष झाला नाही. पण तो सत्तारूढ होताच, गुरूंचा बंदोबस्त केला नाही तर इस्लाम भारतातून नष्ट होईल, असे मुल्ला मौलवी त्याला सांगू लागले. त्यामुळे संघर्षाला पुन्हा प्रारंभ झाला. निरनिराळी कारणे काढून शहाजहान शीखपंथ नष्ट करण्यासाठी आपले सरदार धाडू लागला. प्रथम मुखलीसखान सात हजार फौज घेऊन आला. त्याने अमृतसरवर हल्ला केला, शहर लुटले व हरगोविंद यांचा वाडा लुटला. पण त्या लढाईत खान स्वतःच मारला गेला. यानंतर तीन वर्षांनी क्वायरवेग व आणखी तीन वर्षांनी पैंदाखान व कालेखान असे सरदार स्वारी करून आले, पण हे सर्व सरदार मारले गेले. (ठाकुर देशराज- सिख इतिहास, आठवा अध्याय.) पण असे विजय मिळाले तरी, युद्धप्रसंग सारखे येत गेले तर, आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून गुरू हरगोविंद यांनी अमृतसरहून आपले ठाणे हलविले