पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

अगदी मृतप्राय होऊन पडला होता. या वेळी शीखांनी स्वतंत्र संप्रदाय स्थापून त्यात काही तरी सामर्थ्य निर्माण करण्यात यश मिळविले.

क्षात्रधर्माची दीक्षा :
 शीख संप्रदायाची अनेक वैशिष्ट्ये वर सांगितली. पण त्या सर्वाहून क्षात्रधर्माची दीक्षा प्रत्येक शीखाला देणे, हे त्याचे खरे वैशिष्ट्य होय. त्याच्या ठायी मोगली सत्तेचा, तिने चालविलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे जे काही सामर्थ्य निर्माण झाले ते त्यामुळेच झाले. हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे चार वर्णांपैकी क्षत्रिय वर्णानेच फक्त शस्त्र धारण करावयाचे असते. इतर वर्णाना केवळ आपत्काळापुरते सशस्त्र होण्यास शास्त्राची अपवादात्मक परवानगी आहे. याचा परिणाम हळूहळू असा होत गेला की, बहुसंख्य जो शेतकरीवर्ग आणि शूद्र वर्ण तो स्वराज्य, युद्ध, परकीय आक्रमण यांविषयी उदासीन झाला. आणि युद्धाचा भार एकट्या क्षत्रियवर्णावर पडू लागला. मुस्लीमांमध्ये वर्णव्यवस्था नसल्याने त्या समाजात सर्वच जनता राज्याच्या भवितव्याशी निगडित झालेली असे. आणि स्वराज्य हे त्यांच्या धर्माचेच एक अविभाज्य अंग असल्यामुळे प्रत्येक मुसलमान आपोआपच शस्त्रधारी होई. हिंदुधर्माने निवृत्तीची व अहिंसेची जोपासना करून बहुजन समाजाला स्वराज्य, स्वातंत्र्य यांपासून अलग करून टाकले आणि बहुसंख्य कर्त्या पुरुषांनाही यांविषयी उदासीन केले. त्यामुळेच आत्मरक्षणाचे सामर्थ्य त्या समाजातून नष्ट झाले. हे सर्व ध्यानी घेऊन शीखगुरूंनी शस्त्र हे शीखाच्या धर्मनिष्ठेचेच एक लक्षण आहे, असे ठरवून टाकले. आणि अशा रीतीने तो सर्व समाजच क्षात्रधर्मी बनविला.

आत्मबलिदान :
 तो तसा बनविला नसता तर शीख समाज जगलाच नसता. मुस्लीमांचेही धर्मांतर करून, आणि इस्लामपेक्षा आपली धर्मतत्त्वे श्रेष्ठ आहेत असे जाहीर करून, शीखांनी मोगल साम्राज्यसत्तेला आव्हानच दिले होते. त्यामुळे पहिल्यापासूनच त्या सत्तेची शीखांवर वक्रदृष्टी होती. १६०५ साली जहांगीर तख्तावर येताच त्याने शीखांच्या बंडाचे निर्मूलन करावयाचे ठरविले. आणि त्याचा मुलगा खुश्रू बापाविरुद्ध बंड करून उठला असताना, त्याला गुरू अर्जुन यांनी