पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'राज्य करेगा खालसा'
१८३
 

नावापुढे लावले पाहिजे असा दण्डक घालून दिला. अशा तऱ्हेने शीखसमाज हा एक संप्रदाय झाला. वारकरी, रामदासी यांना आपण संप्रदाय म्हणतो. पण त्याचे नियम असे कडक नाहीत. माळ घातली नाही, टिळे लावले नाहीत, विठ्ठलाहून किंवा रामाहून अन्य देवतांचे भजन केले तर त्या मनुष्याला पंथात स्थान नाही असे कधी घडत नाही. अमुक एक मनुष्याला अमक्या कारणासाठी संप्रदायातून घालवून दिले, असे या संप्रदायात कधीच घडले नाही. अशा बाह्य आचारावर अनुयायित्व अवलंबून ठेविणे हे त्या पंथाच्या प्रवर्तकांना मुळीच मान्य नव्हते. कारण शेवटी हे बाह्य कर्मकांड तेवढे शिल्लक राहून मूळ आत्मा निघून जातो, असे त्यांचे मत होते. पण शीखगुरूंनी या आचारांवर भर देऊन आपल्या पंथाची भिन्नता करकरीत करून टाकली व त्याला एक स्वतंत्र अस्मिता प्राप्त करून दिली.
 पृथगात्मता, भिन्नता यांत शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बल आहे. अखंडात खंड निर्माण झाला, अनंतात सांतता आली, अरूपाला रूप आले की कर्तृत्व निर्माण होते, असे ब्रह्मासंबंधी बोलताना, तत्त्ववेत्ते म्हणतात. मानवाबद्दल ते तितकेच खरे आहे. आपण समूह म्हणून इतरांच्यापेक्षा भिन्न आहो, निराळे आहो अशी जाणीव ज्या समाजात निर्माण होते तो समाज हळूहळू उन्नत होऊ लागतो. अर्थात ज्या कारणांमुळे, ज्या तत्त्वांमुळे तो समाज इतरांपासून आपल्याला पृथक मानतो त्यावर म्हणजे त्या संघटनतत्त्वावर त्याची निष्ठा किती दृढ आहे, अविचल आहे, उत्कट आहे यावर ही उन्नती अवलंबून आहे, हे उघडच आहे. शीखसमाजाने काही धर्मतत्त्वे निराळी मानून त्यांवर आपल्या संप्रदायाची संघटना केली आणि काही आचार, विचार, नियमने ही प्रत्येक घटकाला अवश्य म्हणून लावून देऊन त्याच्या भिन्नपणाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला. अखिल हिंदुसमाज हा त्याच्या धर्मतत्त्वामुळेच इतरांहून पृथक झालेला आहे. पण त्याने आपल्या अंतरातच इतके भेद निर्माण करून ठेविले की त्याला समाज हे रूप राहिलेच नाही. इतरांहून भिन्न होताच आपल्या संप्रदायाच्या अंतरात आपण सर्व अभिन्न आहो ही जाणीव भिन्नतेच्या जाणीवेपेक्षा दसपटीने जास्त परिपोषावी लागते. हिंदुसमाजाने हे कधीच केले नाही. उलट आपल्या अभ्यंतरातही भिन्नतेचाच तो परिपोष करीत राहिला. त्यामुळे त्याचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. आणि पंजाबात शीखांच्या उद्याच्या वेळी तर तो