पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

त्याची शीखपंथाला सहानुभूतीच होती. पण त्याच्यामागून १६०५ मध्ये जहांगीर गादीवर येताच मुस्लीमांच्या धर्मांतराला पायबंद घालण्याचा त्याने निर्धार केला व तेथपासूनच शीख व मुस्लीम हे हाडवैरी झाले. येथून पुढचा शीखपंथाचा सर्व इतिहास हा पंजाबातून मुस्लीम सत्तेचा उच्छेद करण्याचे शीखांनी प्रयत्न केले त्याचा इतिहास आहे.

पृथगात्मता :
 गुरुनानक यांच्यानंतर गुरु अंगद (१५३९-५२) हे त्यांच्या स्थानी आले. हे गुरु अंगद व त्यांच्यानंतरचे चार गुरू अमरदास, रामदास, अर्जुन व हरगोविंद यांच्या काळात (१५५२- १६४५) शीख संप्रदायाची पृथगात्मता निश्चित झाली. सभोवार पसरलेल्या हिंदुसमाजापासून हा संप्रदाय स्पष्टपणे निराळा दिसू लागला. त्याला त्याची अशी अनेक वैशिष्ट्ये या गुरूंनी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे या पंथाच्या विशिष्ट धर्माला संघटनतत्त्वाचे स्वरूप येऊन शीख समाज संघटित झाला. शीख समाज इतर हिंदूंपेक्षा जास्त प्रबल झाला, मोगली सत्तेचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य काही अंशी त्याला प्राप्त झाले, ते या नवधर्मतत्त्वांवरील श्रद्धेमुळे आणि त्या श्रद्धेमुळे जी पृथगात्मता आली तिच्यामुळेच होय.
 गुरू अंगद व गुरू अर्जुन यांनी 'ग्रंथसाहेबा' ची रचना पूर्ण करून शीखांना एक स्वतंत्र धर्मग्रंथ प्राप्त करून दिला. वेदप्रामाण्य त्यांनी त्याज्य ठरविले. हिंदूंची पुराणे, त्यांतील अवतारकल्पना, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये त्यांनी शीखांना वर्ज्य केली. आणि यापुढे शीखांचे विवाहादी सर्व संस्कार ग्रंथसाहेबांतील मंत्रांनी झाले पाहिजेत असा दण्डक वालून दिला. गंगा, यमुना, काशी, प्रयाग, रामेश्वर या सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य अमृतसर येथील सरोवरात साठविले आहे, असे त्यांनी सांगितले आणि वैशाख, माघ व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे शीखांसाठी नवे सण रूढ केले. गुरुगोविंदसिंगांनी शीखांना पृथगात्म करण्याचे हे कार्य पूर्णतेस नेले. पोल नावाचा दीक्षाविधी प्रत्येक शीखाला अवश्य म्हणून त्यांनी सांगितला, केश, कंगवा, कछ, कडे व कृपाण ही शीखांची वैशिष्ट्ये सदैव त्याच्याजवळ असलीच पाहिजेत, असा नियम केला, 'वाह गुरू की फत्ते' हे नमनवाक्य म्हणून ठरवून दिले व प्रत्येक शीखाने दीक्षा घेताच सिंग हे उपपद आपल्या