पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'राज्य करेगा खालसा'
१८१
 

बगदाद या शहरांना भेटी देऊन आले. तेथे असताना त्यांनी अनेक इस्लामी पंडितांशी वादविवाद केले व अनेकांना आपली तत्त्वे पटवून दिली. बगदादला ज्या घरात शेख बहलोल यांच्याशी गुरुनानक यांचा वाद झाला तेथे 'बाबा नानक, फकीर अवलिया यांच्या स्मरणार्थ' अशी पाटी लावलेली आहे. तीवर हिजरी वर्ष ९२७ दिले आहे. म्हणजे ही गोष्ट इ. स. १५२०-२१ साली घडली.

मुस्लीमांना दीक्षा :
 पारंभापासून हिंदू व मुसलमान यांत भेद नाही असा उपदेश नानक करीत असत. आणि हा त्यांचा उपदेश पटल्यामुळे अनेक मुसलमान शीखपंथात त्या काळी आले. अन्य धर्मीयांना संस्कार करून आपल्या धर्मात घेणे ही हिंदू- धर्मीयांची प्राचीन परंपरा पुढे पूर्ण बंद पडली, हे मागे सांगितलेच आहे. पुढे हिंदूंचे सोवळे इतके वाढले की स्वधर्मातून, जुलमामुळे, फसवणुकीमुळे जे च्युत झाले त्यांनाही शुद्ध करून घेण्याचे त्यांनी नाकारले आणि पुढील अनेक अनर्थांचा पाया रचून ठेवला. गुरुनानक यांनी मुस्लीमांनाही शीखपंथात समाविष्ट करून घेण्याचा उपक्रम केला. ही प्रथा कायम टिकली असती तर भारतावरची अनेक संकटे मुळातच नाहीशी झाली असती. पण मुस्लीमांचे धर्मांतर करणे हे दिल्लीच्या मोगल पादशहांना व त्यांच्या मुल्लामौलवींना सहन होणे कधीच शक्य नव्हते. हिंदू सत्ताधीशांना हिंदूंच्या धर्मातराची खंत कधीच वाटली नाही. देवगिरीचे यादव, वरंगळचे काकतीय यांची सत्ता चालू असतानाच सूफी पंथाच्या मुल्लामौलवींनी अनेक हिंदूंना इस्लामची दीक्षा दिली, येवढेच नव्हे तर हिंदू राजे सत्तारूढ असताना त्यांनी हिंदुदेवतांची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्या. हिंदूंच्या धर्मातराची हिंदू राजांना व हिंदू धर्मपंडितांना कधी खंत वाटलीच नाही. पण इस्लामी सुलतान व त्यांचे मुल्लामौलवी याबाबतीत पराकाष्ठेचे जागरूक असत व आजही आहेत. गुरुनानक यांनी आपली धर्मतत्त्वे इस्लामपेक्षा श्रेष्ठ आहेत असे सांगितले आणि अनेक मुस्लीमांना शीख पंथात समाविष्ट केले. यामुळेच पुढे शीखपंथ व दिल्लीचे पादशहा यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. गुरुनानक यांच्या काळी दिल्लीची सत्ता विशेष प्रभावी नव्हती. त्यानंतर अकबर हा फार मोठा बलाढ्य पादशहा झाला. पण त्याची इस्लामनिष्ठा कडवी नव्हती.