पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

१०, ११, ३४ ). पारतंत्र्य व मुस्लीम आक्रमण यांची गुरुनानक यांना अशी खंत वाटत होती. शीख पंथीयांनी पुढे पंथाचे एक तंत्र म्हणूनच क्षात्रधर्माचा अंगीकार केला. गुरुनानकांनी पंथाला अशी दीक्षा दिलेली नव्हती, हे खरे. पण ज्या कारणामुळे शीखांना शस्त्र हाती घ्यावे लागले त्या कारणाची म्हणजे मुस्लीम आक्रमणाची, ह्या पापी सत्तेची जाणीव गुरुनानक यांनी स्पष्ट शब्दांत दिलेली आहे. इतर धर्मपंथ व शीखपंथ यांत हाच भेद आहे.

समता :
 भारतातील भक्तिपंथांनी जातिभेदाचा निषेध केला आहे. पण तो परमार्थ- क्षेत्रापुरता. परमेश्वराच्या पायांशी सर्व जाती सारख्या असा उपदेश ते करीत. पण प्रत्यक्ष व्यवहारातील जातिभेदाचे ते कटाक्षाने समर्थन करीत. शूद्राच्या घरी उत्तम पक्वान्ने असली तरी ब्राह्मणाने ती खाणे योग्य नव्हे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. वरिष्ठ वर्णांची सेवा हाच शूद्राचा धर्म, असे ते सांगतात. आणि हा धर्म 'गोरेया अंगी गोरेपण' इतका जन्मजात व म्हणूनच अटळ आहे, असे त्यांचे मत होते. एकनाथ, तुकाराम या इतर भागवतांनी सर्व जातींनी एकत्र अन्नपानादी व्यवहार करणे हे धर्महानीचे, कलियुगाचे लक्षण म्हणून सांगितले आहे. पण गुरुनानक यांनी व्यावहारिक पातळीवरूनही जातिभेदाचा निषेधच केला आहे. भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, सोवळेओवळे यांचा विचार ते कधीच करीत नसत. खाण्यापिण्यावर काही एक अवलंबून नाही, असे त्यांचे मत होते. शीखांच्या गुरुद्वारात लंगर ही संस्था आहे. तीत मुक्तद्वार सहभोजन चालते. स्वतः गुरुनानक अशा लंगरात जेवीत असत. त्यांचा पहिला शिष्य मर्दाना हा मुसलमान होता. प्रवासात तोच त्यांच्याबरोबर असे. पण स्पर्शास्पर्शाचा वा खाण्यापिण्याचा विधिनिषेध गुरूंनी कधीही पाळला नाही. याप्रमाणे शीखांची समताबुद्धी केवळ परमार्थापुरतीच मर्यादित नसून प्रत्यक्ष व्यवहारातही ती आचरणात आणली जात असे.
 खाणेपिणे, स्पर्शास्पर्श, यावरील निर्बंधांमुळेच भारतातील जातिभेदाला फार कडक व घातक रूप प्राप्त झाले आणि त्यांमुळेच पूर्वी हजारो वर्षे चालू असलेले परदेशगमन, समुद्रपर्यटन हे हिंदूंना निषिद्ध ठरले. गुरुनानक यांनी परदेशगमनाचे हे सर्व नियम झुगारून दिले व आपल्या चवथ्या यात्रापर्वात ते मक्का, मदिना,