पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'राज्य करेगा खालसा'
१७९
 

होते. पूर्ण संसारत्याग केल्यावाचून मोक्ष मिळत नाही, असे त्यांचे मत होते. त्यांच्या पंथाला उदासी पंथ म्हणतात. त्या पंथाच्या अनुयायांना शीख समाज स्वकीय मानीत नाही. नानकानंतरचे गुरू अंगद (१५३९- १५५२) यांनी तर एवढ्याच कारणासाठी उदासी पंथीयांना संप्रदायाच्या बाहेर घालविले. निवृत्ती हा विघटक धर्म आहे हे गुरू अंगद यांनी नेमके जाणले होते. त्यामुळेच त्यांनी श्रीचंदाच्या अनुयायांना थारा दिला नाही. पुढे पुढे शीख गुरूंनी अनेक शहरे वसविली, व्यापार, उद्योगधंदे यांकडे लक्ष पुरविले व आपल्या अनुयायांना तशी प्रेरणा दिली, यावरून गुरुनानक यांचा धर्म मुळापासूनच प्रवृत्तिरूप होता हे ध्यानी येईल. नानकांनी केलेल्या धर्मपरिवर्तनाचे हे पहिले लक्षण होय.

प्रवृत्तिधर्म :
 पण गुरुनानकांच्या प्रवृत्तिपरतेचे यापेक्षा मोठे लक्षण म्हणजे ते परिस्थितीविषयी केव्हाही उदासीन राहिले नाहीत, हे होय. भक्तिमार्गी संत हे मुस्लीम आक्रमणाचा, त्यांनी केलेले जुलूम, अत्याचार, स्त्रियांची विटंबना यांचा उल्लेखही करीत नाहीत. भोवतालच्या परिस्थितीविषयी ते जळातल्या कमळाप्रमाणे अलिप्त असतात. पण गुरुनानक यांची वृत्ती अशी नव्हती. त्यांनी मुस्लीम अत्याचारांचा, बाबराच्या सैतानी वृत्तीचा अत्यंत जळजळीत शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणतात, "क्रूर बाबर आपल्याबरोबर पापाची सेना घेऊन भारतावर चाल करून आला आहे. तो बलात्काराने धन व संपत्ती मागत आहे. लोकलज्जा व धर्म दोन्ही पळून गेले आहेत. सर्वत्र असत्य व पाप यांचा अंमल चालू आहे. निरपराधी जनतेवर मोगल राजे भुकी व्याघ्राप्रमाणे तुटून पडत आहेत. आणि त्यांचे साहाय्यक शिकारी कुत्र्यांप्रमाणे त्यांना मदत करीत आहेत. बाबराने आपल्या दूतांना सांगितले की, स्त्रियांचे सौभाग्य लुटा, आणि त्याच्या या घोषणेमुळे कोणाही राजाला सुखाने जेवता येत नाही. हे परमात्मा, तुम्ही खुरासानवर कृपा केली व भारतावर कोप केला आहे. कोणी तुम्हांला प्रत्यक्ष दोष देऊ नये म्हणून यमरूपी यवनांना तुम्ही येथे अत्याचार करण्यास धाडलेले दिसते. हे भगवान, हिंदूंनी पुष्कळ सहन केले आहे, मार खाल्ला आहे, पण तुम्ही तर सर्वाचे आहा ना?" (शीखांचा इतिहास, न. वि. गाडगीळ, पृ.