पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

होईपर्यंत, पंजाब पारतंत्र्यातच होता. त्याला मुक्त केला तो शीखांनी. पंजाबात स्वराज्याची स्थापना होऊन काश्मीर, पेशावर व पंजाब हे प्रदेश बलुचिस्थान, अफगाणिस्थान या प्रदेशांप्रमाणे हिंदुधर्माला व हिंदुसंस्कृतीला कायमचे मुकले नाहीत, याचे श्रेय गुरुगोविंदांच्या या शिष्यांना- शीखांना आहे.
 आधीच्या पाच-सहाशे वर्षांत पंजाबी जनतेला जे साधले नाही ते शीखांना कसे साधले, त्यांच्याच ठायी प्रतिकारसामर्थ्य कोठून आले, त्यांचाच पुरुषार्थ जागृत कसा झाला, त्यांनी काही धर्मक्रान्ती केली काय, काही नवे संघटनतत्त्व अंगीकारले काय, धर्मक्रान्ती केली असल्यास तिचे स्वरूप काय होते, त्या क्रांतीच्या तत्त्वांवरील निष्ठा शीखांनी अचल राखली काय, या व अशा सर्व प्रश्नांचे विवेचन आता करावयाचे आहे. 'शीख' या शक्तीच्या स्वरूपाचे, तिच्या यशापयशाचे संपूर्ण परीक्षण करून हिंदुसमाजाच्या संघटनक्षमतेविषयी काही निर्णय करावयाचे आहेत. 'राज्य करेगा खालसा' खालसाचे- शीखपंथाचे अनुयायी- स्वराज्यस्थापना करतील ही गुरुगोविंदसिंग यांची भविष्यवाणी कोणत्या अर्थाने खरी ठरली, किती सार्थ झाली हे पहावयाचे आहे.

धर्मक्रांती :
 शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचा जन्म पंजाबातील तळवंडी या गावी इ. स. १४६९ साली झाला आणि १५३९ साली त्यांनी इहलोक सोडला. या दीर्घकाळात त्यांनी जो संप्रदाय प्रवर्तित केला त्याचे स्वरूप बाह्यतः इतर भक्तिमार्ग संप्रदायांसारखे असले तरी प्रथमपासूनच त्यात फार महत्त्वाचे भेद होते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. गुरुनानक यांनी निवृत्ती, संसार- त्याग, संन्यास यांचा अत्यंत तीव्र निषेध केला आहे. भक्तिमार्गी साधुसंत हे संन्यासाचा उपदेश करीत नाहीत. संसारात राहूनच मोक्ष मिळतो असे सांगतात. अरण्यवासाची केव्हा चेष्टाही करतात. पण त्याचबरोबर ते संसाराची अत्यंत बीभत्स अशी निंदाही करतात. स्त्री-पुत्र, धन-दौलत, कीर्ती, वैभव यांची साधुसंतांनी कमालीची हेटाळणी केली आहे. यांबद्दलची उदासीनता हाच तर हिंदुसमाजाचा त्या काळी मुख्य रोग होता. गुरुनानक यांनी अशी संसाराची निंदा केली नाही. इतकेच नव्हे तर संसारत्यागाचा उपदेश करणाऱ्यांना आपल्या पंथात स्थानच दिले नाही. नानक यांचे पुत्र श्रीचंद हे संन्यासपक्षाचे