पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'राज्य करेगा खालसा'
१७७
 

जाळपोळ, विध्वंस, कत्तल, बलात्कार हीच पंजाबच्या जीवनाची प्रकृती होऊन बसली होती. पंजाबचा इतिहास वाचताना, हे लोक जगले तरी कशाच्या आधारावर, असा प्रश्न पडतो. मानवी जमाती अगदी समूळ अशा नष्ट सहसा होत नाहीत. कसे तरी प्राणधारण त्या करीत असतात. पण परंपरेचा धागा अखंड टिकवून, पूर्वसूरींचा वारसा सांगत जो समाज टिकून राहतो तोच जगला असे म्हणणे सार्थ आहे. दीर्घकालीन पारतंत्र्यात पंजाबचे लोक अशा अर्थाने जगले काय, आणि जगले असले तर कशाच्या बळावर, कोणाच्या सामर्थ्याने या प्रश्नाचा आपल्याला विचार करावयाचा आहे.
 पंजाबचे लोक खऱ्या अर्थाने जगले असे इतिहास निःसंशय सांगत आहे. आणि याचे श्रेय बव्हंशी शीख या क्षात्रधर्मी, शूर, मर्द समाजाला, या लढाऊ जमातीला, गुरू नानक, गुरू गोविंदसिंग यांचा वारसा सांगणाऱ्या या पराक्रमी लोकांना आहे. ही पराक्रमाची प्रेरणा या समाजाला कोठून मिळाली, त्याला सामर्थ्य कसे प्राप्त झाले, त्याने संघटनतत्त्व कोणते अवलंबिले व परकीय आक्रमकांचा प्रतिकार करून भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात त्याला कितपत यश आले, याचा या लेखात विचार करावयाचा आहे.
 मागील अनेक लेखांत सांगितल्याप्रमाणे या काळात हिंदुधर्माला अत्यंत हीन व विकृत रूप आले असल्यामुळे स्वसमाजाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य हिंदु- समाजाच्या ठायी राहिले नव्हते. शतकेच्या शतके मुस्लीमांनी इतके भयानक अत्याचार हिंदूंवर केले होते की, पूर्वीच्या शतांश जरी स्वाभिमान त्यांच्या ठायी असता तरी त्यांनी या सैतानी आक्रमणाचा प्रतिकार केला असता. पण निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अस्पृश्यता, दैववाद, कर्मवाद, कलियुग, कर्मकांड, अपरिवर्तनीयता, असे एकाहून एक दुर्धर रोग या समाजाला जडलेले असताना, त्याच्या ठायी स्वभिमान जागृत होऊन त्याला सामर्थ्य प्राप्त होणे शक्यच नव्हते. तसे होण्यासाठी धर्मक्रान्तीचीच आवश्यकता होती. मराठे, विजयनगर यांनी धर्मक्रान्ती घडविली म्हणूनच त्यांना यश आले, हे मागील लेखात सांगितलेच आहे. बंगाल, गुजराथ, राजस्थान येथे अशा तऱ्हेची क्रांती झाली नाही म्हणून ते देश पारतंत्र्यात कायमचे खितपत पडले हेही तेथे दाखविले आहे. पंजाबमध्ये शीखांचा उदय झाला नसता तर तेथेही हेच झाले असते, यात शंका नाही. शीखांचा उदय होण्यापूर्वी व नंतरही ते संघटित
 १२-१३