पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

खस इ. अनेक नावे आपल्याला प्राचीन संस्कृत वाङ्मयात सापडतात. येथे एका गोष्टीचा खुलासा करणे अवश्य वाटते. आतापर्यंत पंडितांनी, विशेषतः पाश्चात्त्य पंडितांनी, भारतातील प्राचीन जमातींविषयी जे संशोधन केले त्याअन्वये आर्य हा शब्द वंशवाचक समजला जात असे. त्याचप्रमाणे येथल्या मूळच्या सर्व जनाती अनार्य, दास, दस्यू, अशा मानल्या जात असत. गोरे आर्य यांनी या काळ्या अनार्यांना जिंकले व मग त्यांच्या संकरातून चारवर्णी लोक निर्माण झाले असा रूढ समज आहे. पण ही सर्व मते आता अगदी निराधार ठरली आहेत. आर्य शब्द वंश, वर्ण या अर्थी वेदांत एकदाही येत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यांना जिंकले ते सर्व काळे, कुरूप, रानटी होते असेही नाही. नवे मत असे आहे की आर्य हा शब्द श्रेष्ठत्व, प्रभुत्व, सुसंस्कृतत्व याचा वाचक आहे. (ज्ञानकोश- प्रस्तावना खंड, विभाग ३ रा, प्रकरण तिसरे) या मताच्या आधाराने त्या वेळच्या समाजघडणीचे पुढीलप्रमाणे वर्णन करता येईल.
 त्या प्राचीनकाळी यज्ञरूपाने अग्नीची पूजा करणारा एक थोर पराक्रमी प्रज्ञावंत व बुद्धिमान असा वर्ग येथल्याच जमातीतून उदयास आला किंवा बाहेरून येथे आला. पण यजनशीलता व तत्संबद्ध अशी वैदिक संस्कृती हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण होते. भिन्न वंश किंवा शुभ्रवर्ण हे नव्हते. आणि यज्ञसंस्था व वेदविद्या यामुळे हा वर्ग आपल्याला श्रेष्ठ व आर्य म्हणवू लागला. या वर्गात सुर होते तसेच असुरही होते. (असुर शब्दाचा एक अर्थ श्रेष्ठ देव, प्रभु असाही होता. पुढे याचे स्पष्टीकरण केले आहे.) आणि द्रविड, दैत्य, नाग या ज्या जमाती त्यांतलेही लोक लवकरच या संस्कृतीत समाविष्ट झाले. आर्यांनी याला विरोध केला नाही, एवढेच नव्हे तर तसा समावेश करून घेऊन सर्व विश्व आर्य करावयाचे- कृण्वंतो विश्वमार्यम्- ही त्यांची प्रतिज्ञाच होती. ही नुसती प्रतिज्ञाच पाहिली तरी आर्य शब्द वंशवाचक किंवा वर्णवाचक नव्हता हे ध्यानात येईल. कारण वंश किंवा वर्ण हा बदलणे शक्य नसते. सर्वांना वेदनिष्ठ यज्ञप्रधान संस्कृतीत समाविष्ट करावयाचे हाच त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे. जाती, वंश, वर्ण, जितजेतेभाव हा त्या प्रतिज्ञा करणाऱ्यांच्या स्वप्नातही नव्हता हे अगदी स्पष्ट आहे. अशा या आर्य लोकांचे व भारतातल्या इतर जमातींचे प्रारंभी घनघोर संग्राम झाले हे खरे आहे. पण आर्याआर्यातही त्यांच्या भरत, तुर्वसु, तृत्सु, द्रुह्यू या जमातींतही संग्राम झालेले आहेत.