पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







'राज्य करेगा खालसा'



प्रास्ताविक :
 इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या अखेरीस गझनीचा सुलतान सबक्तगीन याने पंजाबचा राजा जयपाळ याचा पराभव केला आणि तेव्हापासून त्या प्रदेशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. सबक्तगीनाचा मुलगा महंमद याने अनंगपाळाचा पराभव केला आणि तेव्हापासून पंजाब हा आपल्या राज्याचा एक अंकित प्रदेश आहे. असे गझनीचे अफगाण राजे मानू लागले. पंजाबवर हक्क सांगण्याची पठाणांची ही वृत्ती आठशे साडेआठशे वर्षे कायम होती. १८१० च्या सुमारास महाराजा रणजितसिंग यांनी पंजाब मुक्त करून तेथे स्वराज्याची स्थापना केली तरी पठाणांनी ते कधीच मान्य केले नाही. १८३७ पर्यंत ते भारतावर स्वाऱ्या करीतच होते. त्यांना यश मिळाले नाही हे निराळे. पण पंजाब हा आपला आहे ही त्यांची भावना अखेरपर्यंत कायम होती. आणि तो परत घेण्यासाठी ते वारंवार जिहाद पुकारीत, हे आपण विसरू नये.
 मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शतकानुशतकांचे दीर्घकालीन पारतंत्र्य हे भारतातील बंगाल, बिहार, गुजराथ, माळवा, अयोध्या इ. अनेक प्रदेशांच्या नशिबी आले होते. पण पंजाब हा वायव्य सरहद्दीचा प्रदेश असल्यामुळे पारतंत्र्य, गुलामगिरी यांच्या भरीला कायमचे अराजक, रणधुमाळी, लूटमार,