पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

१७६२ ते ७० या काळात येथे मराठ्यांनी केली असती तरच मराठ्यांना अखिल भारतात साम्राज्य स्थापून इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्चात्य आक्रमणाचेही निर्दालन करता आले असते. (तशी क्रान्ती अजूनही येथे झालेली नाही. त्यामुळे अजूनही आपल्याला आपल्यावरील आक्रमणांचा निःपात करता येत नाही.) पण ती तेव्हा झाली नाही. त्यामुळे, 'येथे इंग्रजांचे राज्य झाले नसते तर फ्रेंचांचे झाले असते', 'बाजीरावाला दीर्घायुष्य मिळूनही पारतंत्र्य टळले नसते', 'चॅथॅमसारखे कर्ते पुरुष येथे निर्माण होणे शक्य नव्हते' ही मते मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.

समाजधर्माच्या अभावी :
 हिंदुधर्मं हा व्यक्तिनिष्ठ धर्म आहे. त्याला समाजधर्माचे, राष्ट्रधर्मांचे रूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो स्वधर्मीयांना संघटित करू शकणार नाही. आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की, धर्माला समाजनिष्ठ धर्माचे रूप आले नाही तर व्यक्तिधर्मही तगू शकत नाही. संतांचा पुराणप्रणीत भागवतधर्म तर भारतात प्रचलित होता ना ? मग कमालीची वतनासक्ती, त्यापायी वाटेल ती पापे आचरण्याची वृत्ती या मराठ्यांच्या दुर्गुणांना आळा का बसला नाही ? राजस्थानातही संतसाधू होतेच; पण असे एक पाप नाही व दुष्कृत्य नाही की जे रजपुतांनी आचरले नाही. यदुनाथ सरकार म्हणतात, '१७०७ नंतर तर पाशवी वासनांचे राजस्थानात सैतानी तांडवच सुरू झाले. बाप मुलाचा, मुलगा बापाचा खून करतो आहे, थोर घराण्यांतल्या स्त्रिया आप्तांवरही विषप्रयोग करण्यास कचरत नाहीत, राजे मंत्र्यांचे खून पाडीत आहेत, स्वकीयांना मारण्यासाठी रामाच्या वंशातले राजेही परकीय लुटारूंचे साह्य घेत आहेत; दारू, अफू, व्यभिचार यांना तर सीमाच नाही, अशी रजपुतांची स्थिती होती.' (फॉल ऑफ दि मुघल एंपायर, पृ. २३६, ३७) मराठ्यांना राष्ट्रधर्माची काही तरी जाणीव होती. त्यामुळे इतकी घोर पापे या प्रमाणात त्यांनी केली नाहीत, इतकेच. त्यांपासून ते मुक्त होते असे मात्र नाही. समाजनिष्ठ धर्मामुळे, राष्ट्रनिष्ठेमुळे मनुष्याचे मन व्यक्तिनिष्ठ धर्मापेक्षा जास्त उदार व उदात्त होते. व्यक्तिधर्मात हे चैतन्य नाही. समाजदृष्टिहीन व्यक्तिनिष्ठधर्म लोकांना विघटित करतो. मग तो समाज दुबळा होऊन परतंत्र होतो आणि त्याचा नैतिक अधःपातही