पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१७३
 

बंगाली, बिहारी, उरिया, आसामी यांपैकी कोणीही त्या सत्तेवर आघात करून तेथे हिंदुवर्चस्व स्थापन केले नाही. ते कार्य दक्षिणेतून जाऊन मराठ्यांनी केले आणि वरील प्रदेशही मुस्लीम वर्चस्वापासून सोडविले. तेव्हा मराठ्यांच्या ठायी एक नवीन जोम, एक नवीन शक्ती निर्माण झाली होती यांत शंका नाही. पण शिवसमर्थांनी आरंभिलेली धर्मक्रान्ती सर्व क्षेत्रांत पूर्ण करून नवधर्मतत्त्वांचा प्रसार सर्व समाजात करण्याचा उद्योग येथले आचार्य, शास्त्री, पंडित, कवी, तत्त्ववेत्ते, कीर्तनकार यांनी न केल्यामुळे त्या शक्तीला जडत्व आले, अंधत्व आले. त्यामुळे मराठ्यांना मुस्लीमसत्ता भारतातून निर्मूल करण्यापलीकडे काही साधले नाही.

धर्मक्रान्ती होती तर :
 मराठ्यांना पानपतावर जय मिळाला असता तर भारतात व्यवस्थित साम्राज्य स्थापण्यात त्यांना यश आले असते काय ? काही पंडितांनी यश आले असते, असे म्हटले आहे. पंजाब विद्यापीठातील इतिहासाचे एक प्राध्यापक प्रेमराज वर्मा यांनी तसे म्हटले आहे. त्या वेळच्या अनेक सत्तांपैकी मराठ्यांच्याच ठायी फक्त भारतीय साम्राज्य स्थापन करण्यास अवश्य ते नैतिक, बौद्धिक व भौतिक सामर्थ्य होते, असे ते म्हणतात. (मराठाज ॲण्ड पानिपत- हॅड दि मराठाज वन, पृ. २७०) असा पूर्ण संभव होता असे निश्चित वाटते; पण यानंतर जपानप्रमाणे अत्यंत वेगाने अवश्य ती धर्मक्रान्ती व मानसिक क्रान्ती मराठ्यांनी केली असती तरच ब्रिटिश आक्रमणापासून भारताचे संरक्षण त्यांना करता आले असते. कमोडोर पेरी या अमेरिकन सेनापतीने तोफांच्या बळावर अपमानास्पद तह जपानवर लादताच सत्सुमा, चोशियु, टोसा व हिझेन या चार मोठ्या सरदारांनी आपले सरंजाम खाली करून सम्राटाच्या स्वाधीन केले. शिंदे, होळकर, गायकवाड, नागपूरकर भोसले, पवार, पटवर्धन यांनी तसे केले असते तरच येथे संघटित सामर्थ्य निर्माण झाले असते. सम्राट मुटसुहिटो त्या वेळी बाल होता. त्याला नवे पाश्चात्य संस्कार करून त्या सरदारांनी कर्तृत्वसंपन्न केले. तेथला शोगुन म्हणजे पेशवा हा येथल्याप्रमाणेच सर्वसत्ताधारी होता. त्यानेही सत्तात्याग केला. प्रिन्स इटो, मार्क्विस इनोई व आणखी तिघे सामुराई- वरिष्ठ वर्णाचे लोक– इंग्लंडला गेले व परत येताना पाश्चात्य विद्या घेऊन आले. अशी क्रांती