पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

काम करण्याला जातिभेद आड येणारच ! हे एका साध्या कारखान्याचे झाले. मग शास्त्रीय संशोधनात किती पदार्थांच्या बाबतीत ब्राह्मण्य आड आले असते याची कल्पनाच करावी. तेथे अनेक जीवांची हत्या करावी लागते. त्यांची चरबीच काय, त्यांचे रक्तमांस तपासावे लागते. त्यांच्यापासून व इतर अशाच वर्ज्य ठरलेल्या वस्तूंपासून झालेले पदार्थ संशोधनात वापरावे लागतात. अर्थात त्यामुळे जात बाटणारच. तेव्हा शास्त्रीय संशोधन ही कल्पनाच भारतात त्या काळात शक्य नव्हती. (श्रीशिवछत्रपतींनी याही बाबतीत रूढ धर्म बाजूस ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी छापखाना काढण्याचा प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी न झाल्यामुळे १६७४ साली तो भीमजी पारेख याला विकला, अशी आख्यायिका आहे.) संशोधन लांब राहिले. सतराव्या-अठराव्या शतकात इंग्रज जसे येथल्या भाषा शिकत होते तसे मराठे इंग्रजी शिकले असते, तरी येथे धर्मक्रान्ती घडण्याचा संभव होता; पण एकोणिसाव्या शतकातही इंग्रजी भाषा शिकल्याने ब्राह्मणपणा जातो, अशी समजूत होती. जे इंग्रजी शिकले ते नास्तिक, निर्दय, अधर्मी, अमर्याद आहेत, असे लोक मानीत होते. (माडखोलकर-चिपळूणकर, काल आणि कर्तृत्व', पृ. ५९, ४२, ४३ चतुर्थ संस्करण इ. स. १९५४) परदेशगमन, परभाषाअध्ययन, ग्रंथाभ्यास ही ज्ञानाची द्वारे. तीच जातिभेदाने बंद केली होती.

स्वल्पमप्यस्य धमस्य :
 हिंदूंच्या अधर्मशास्त्राने भारताची स्थिती अशी करून टाकलेली असताना त्या धर्मशास्त्राचा उच्छेद केल्यावाचून येथे कसलीही प्रगती होणे शक्य नव्हते. तसा थोडासा प्रयत्न शिवसमर्थांनी केला. त्यांच्या तेजस्वी महाराष्ट्रधर्मामुळे, त्याच्या स्वल्प प्रसारामुळेसुद्धा हिंदुसंस्कृती नष्ट होण्याच्या महान भयापासून भारताचे संरक्षण करण्याची महाशक्ती मराठ्यांच्या ठायी आली. इ. स. १७०७ नंतर शंभर वर्षेपर्यंत दिल्लीच्या तख्तावर अत्यंत नादान, कर्तृत्वशून्य, व्यसनासक्त, बेजबाबदार असे पातशहा होते. त्यांचे वजीरही त्याच मासल्याचे होते. (इंग्रज, मुस्लीम इ. अनेक लेखकांचे आधार देऊन यदुनाथ सरकार यांनी हे दाखवून दिले आहे. फॉल ऑफ दि मुघल एंपायर, खंड ला, पृ. १ ते १५) अशी स्थिती असूनही पंजाबचे शीख, राजस्थानचे रजपूत, बुंदेले,