पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१७१
 

गेल्यावर त्यांचा संसर्ग होणार, मग जात बाटणार व मग त्या व्यक्तीवर बहिष्कार पडणार! 'गेल्या शतकात गंगाधर दीक्षित फडके हा मनुष्य इंग्रजांस शिकविण्याकरिता पंडित म्हणून ५ वर्षे मुंबईस राहिला होता. तो परत आल्यावर, पाच वर्षे मुंबईत राहिलेला माणूस बाटल्याशिवाय कसा राहिला असेल, असे ठरवून त्यांवर सर्वांनी बहिष्कार घातला. शेवटी तो संन्यास घेऊन मेला.' अशी एक गोष्ट लोकहितवादींनी दिली आहे. त्याच सुमारास 'एक हिंदुधर्माभिमानी' या सहीने 'प्रभाकर' या पत्रात एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. लेखक म्हणतो, 'मुंबईत हिंदुधर्म रसातळाला गेला हे ऐकून मी मुंबईत पाऊल ठेवणार नव्हतो; पण नाइलाजाने जावे लागले. तेथील हिंदु लोकांची मने बहकून गेली आहेत. कोणी म्हणतात पुनर्विवाह करा, मुलींना शाळेत पाठवा. सरकारी शाळेतून महारधेडांच्या मुलांना प्रवेश द्यावा, असेही काही म्हणतात. यावरून हिंदुधर्मविनाशास आपलेच लोक कारणीभूत आहेत असे दिसते.' (नाना शंकरशेट चरित्र, पृ. ११०) मुंबईस इंग्रजांच्या संसर्गात येणे, मुलींना शिकविणे, अस्पृश्यांना शाळेत घालणे ही हिंदुधर्म रसातळाला गेल्याची लक्षणे गेल्या शतकात ठरत. मग मराठेशाहीत काय असेल ! ही हिंदुधर्माच्या विनाशाची लक्षणे असे मानणारे हिंदुधर्मशास्त्र हे अधर्मशास्त्र होय, हे कोणाच्याही लक्षात येईल. वरील चरित्राच्या लेखकाने हा धर्म नसून अधर्म होय, असेच मत दिले आहे. इंग्रज वा मुस्लीम यांचे राज्य आमच्यावर झाले, आम्ही त्यांचे गुलाम झालो, तर त्यांत हिंदुधर्महानी नाही. त्यांच्या सहवासात जाण्यात किंवा हिंदुधर्मीय जे महारधेड त्यांच्या सहवासात जाण्यात मात्र आहे ! हा सर्व जातिभेदाचा प्रभाव आहे. तेव्हा हे स्पष्टच आहे की, परदेशगमन, ज्ञानार्जन, विज्ञानसंशोधन, बहुजनांना राष्ट्रधर्माची शिकवण देणे हे सर्व जातिभेदामुळे अशक्य झाले होते. आमच्या सर्व कर्तृत्वाला जातिभेदामुळे गळफास बसला होता.
 छापखाना हे अर्वाचीन युगातले मोठे ज्ञानसाधन. पोर्तुगीजांनी गोव्यात १५५० च्या सुमारास तो आणला होता. त्याच वेळी भारतात त्याचा प्रसार झाला असता तर ? पण ते होणे अशक्य होते. कारण जातिभेद! शाईमध्ये चरबी असते त्यामुळे वरिष्ठ जातींतील धर्मशील लोक गेल्या शतकातही छापील ग्रंथांना शिवत नसत. बाळशास्त्री जांभेकरांना 'दिग्दर्शन' हे तुपाच्या शाईत छापलेले आहे, असा खुलासा मुद्दाम करावा लागला होता. अशा स्थितीत छापखान्यात