पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

करणारा पुरुष हिंदूंमध्ये झाला नाही. त्या धर्मात ते तत्त्वच नाही. विघटना हेच त्याचे प्रधान लक्षण होऊन बसले होते. त्यामुळे अखिल हिंदुधर्मीयांची संघटना ही कल्पनाच शक्य नव्हती. या वेळी सर्व शंकराचार्य, पंथाचार्य, मठाधिपती, संतमहंत यांनी एकत्र येऊन अखिल भारतभर भ्रमण करून हिंदुधर्माला हे रूप दिले असते तरच हिंदुशक्ती संघटित होऊन हिंदुपदपातशाही प्रत्यक्षात अवतरली असती; पण मुस्लीम, इंग्रज, पोर्तुगीज यांची कृपा संपादून आपापल्या गाद्या संभाळण्यात व वतनाप्रमाणेच त्यांसाठी भांडण्यात अखंड मन असलेले हे धर्मधुरीण हिंदुधर्मसंघटनेकडे कसे लक्ष पोचविणार ?

जातिभेदाचा गळफास :
 जातिभेद हे मराठ्यांच्या अपयशाचे एक प्रधान कारण म्हणून यदुनाथ सरकार, हरिराम गुप्ता इ. काही पंडितांनी दिले आहे. तात्यासाहेब केळकर, नानासाहेब सरदेसाई यांनी हे मत खोडून काढले आहे. मराठ्यांत जी दुही झाली, फळ्या पडल्या, पक्ष पडले ते जातीअन्वये पडले नाहीत, प्रत्येक पक्षात सर्व जाती पोट- जातींचे लोक होते, असे दाखवून देऊन विनाशाला जातिभेद मुळीच कारण झाला नाही असे मत या दोघा थोर इतिहासवेत्त्यांनी मांडले आहे. त्यांनी मांडलेला युक्तिवाद बरोबर आहे; पण पक्ष पडणे, फळ्या पडणे एवढीच हानी जातिभेदाने होते असे नाही. जातिभेदामुळे हिंदूंचे शंकराचार्यादी धर्मधुरीण शूद्र, अस्पृश्य यांच्यात मिसळू शकत नाहीत. त्यांच्याविषयी आपले काही कर्तव्य आहे असेही त्यांना वाटत नाही. जातिभेद नसता तर हे धर्मवेत्ते त्यांच्यात जाऊन राहिले असते आणि इंग्रज मिशनऱ्यांनी बहुजनसमाजाला जसा राष्ट्रधर्म शिकविला, तसा यांनी शिवसमर्थांचा धर्म बहुजनांना शिकविला असता. जातिभेद नसता तर हिंदूंनी परदेशप्रवास केला असता व युरोपातले नवीन भौतिक ज्ञान हस्तगत केले असते आणि मग परत येऊन आपल्या समाजात विज्ञाननिष्ठा निर्माण केली असती. तिच्या अभावी आपला विनाश झाला हे तर उघडच आहे. जातिभेद नसता तर या देशात तरी प्रवास करून इंग्रज, मुस्लीम यांच्यात आपले लोक मिसळले असते आणि इंग्रजांचे जवळून अवलोकन केल्यावर त्यांची विद्या, त्यांची राजनीती, त्यांची निष्ठा, त्यांची कारस्थाने यांचा तरी संस्कार आपल्यावर होऊन विज्ञाननिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यांचे आकलन येथल्या येथेच आपल्याला झाले असते; पण इंग्रजांच्या सहवासात