पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१६९
 

त्यातही आणखी खेदाची गोष्ट अशी की, वतने व सरंजाम हे पराक्रमासाठी असतात, मराठा राज्याची सेवा करण्यासाठी असतात एवढाही समज मराठा सरदारांनी संभाळला नाही. कार्य न करता, सेवा न करता, सरंजाम आणि वतने कायम राहिली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. बाजीराव पेशवा असताना प्रतिनिधी, सेनापती, अमात्य, सुमंत हे सर्व निष्क्रिय झाले होते; पण त्यांचे सरंजाम मात्र चालू होते. शाहूमहाराजांना ते खालसा करणे मंजूर नव्हते. त्यामुळे इकडे अमाप धन या निष्क्रिय वतनदारांना पोसण्यात खर्च होत होते आणि अखिल भारतभर मोहिमा चालविण्यासाठी जे लष्कर उभारावयाचे त्यासाठी पैसा उभा करताना पेशवे हैराण होत होते. ते कायम कर्जबाजारी राहण्याचे हे कारण होते. ऐतखाऊंचे सरंजाम खालसा झाले असते तर तो पैसा हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी उपलब्ध झाला असता आणि मग शस्त्रशक्ती व धनशक्ती यांचा संयोग होऊन मराठ्यांना आले याच्या शतपट जास्त यश आले असते. भावार्थ असा की, सातारा व पुणे येथे छत्रपतींची व पेशव्यांची दृढ, स्थिर व अविचल अशी सत्ता असती व त्यांचे सरदार एकनिष्ठ, धर्मनिष्ठ व स्वामिनिष्ठ असते तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक प्रदेशात मराठ्यांना स्थिरपद राज्य स्थापून उत्तम राज्यकारभार करता आला असता. इंग्रजांची मूळ इंग्लंडमधील सत्ता दृढ होती व क्लाइव्ह, हेस्टिंग्ज, वेलस्ली या त्यांच्या सरदारांची राष्ट्रनिष्ठा संशयातीत होती. या बळावर त्यांनी जे करून दाखविले ते मराठ्यांनीही केले असते; पण मूळ राज्याला स्थैर्य नाही, सरदारांत निष्ठा नाही आणि खजिन्यात धन नाही अशा स्थितीत चौथाईच्या निमित्ताने सर्व दिशांना संचार करून मुस्लीम सत्ता नष्ट करणे येवढेच मराठ्यांना शक्य होते. थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीपर्यंत मराठे हे हिंदुधर्माचे संरक्षक, पेशवे हिंदूंचे त्राते अशी उदात्त भूमिका मराठ्यांची होती व ती उत्तर हिंदुस्थानातही सर्वांना मान्य होती; पण पुढे मराठा सरदारांचे हे ध्येय सुटले. धनलोभाने ते रजपुतांवर, जाटांवर अत्याचार करू लागले. शिंद्यांनी एका रजपूत वारसाचा पक्ष घेतला तर होळकरांनी दुसऱ्याचा घ्यावा व दोघांनी आपसात लढाई करावी हा प्रकार नित्याचा झाला. यामुळे मराठ्यांची प्रतिष्ठा गेली व त्यांच्या नावाला लुटारू, दरोडेखोर असा कलंक लागला. रजपूत, जाट, बुंदेले हे हिंदू असूनही त्यांचे वैरी बनले. पानपतावर नजीबखानाने अबदाली, रोहिले, सुजाउद्दौला इ. सर्व मुस्लीम सत्तांची एकजूट केली; पण हिंदुसत्तांची एकजूट