पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

पेशवे नाकर्ते झाले, तेव्हा तरी हे करावयाचे ! पेशवेपद तरी दुसऱ्या कोणा कर्त्या पुरुषाला द्यावयाचे; पण त्यासाठी सर्व मराठमंडळ संघटित असणे अवश्य होते. सर्व धर्मनिष्ठेने प्रेरित झाले असते तर ते अशक्य नव्हते; पण त्यांचा धर्म म्हणजे स्नानसंध्या, उपासतापास, सोवळेओवळे हा होता. त्याचा संघटनेशी संबंध नव्हता. अशा स्थितीत 'पेशवे कशीबशी धडपड करून, मराठमंडळाची जुळेल तशी एकत्र मोट बांधून, पुढे पाऊल टाकीत होते. आणि हिंदुस्थानभर पराक्रम गाजविण्याची त्यांस संधी देत होते. सरदारांची महत्त्वाकांक्षा मात्र अशी की, आपण संपादिलेले वतन आपल्या पश्चात आपल्या संततीस मिळावे. मुख्यतः लाचलुचपतीवरच मराठे सरदार पराक्रम गाजवीत. दर एक सनदेत व पत्रात प्रत्येकाची ही ऐहिक हाव स्पष्ट सांगितलेली असते.' (सरदेसाई कित्ता, पृ. २४४, २३६) अशा प्रकारे वतनाचा, धनाचा, सत्तेचा लोभ हीच बहुतेक सर्वांची प्रधान प्रेरणा असल्यामुळे पंजाब, रोहिलखंड, बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आंध्र या प्रदेशांत मराठ्यांना माळवा व गुजराथ येथल्याप्रमाणे प्रत्यक्ष राज्यस्थापना करता आली नाही.

ध्येयशून्य पराक्रम :
 श्रीशिवछत्रपती व समर्थ यांच्या महाराष्ट्रधर्मांच्या उपदेशाने व प्रत्यक्ष आचरणाने महाराष्ट्रात अनेक पराक्रमी, बलशाली व कर्तबगार घराणी निर्माण झाली; पण पुढे ती धर्मनिष्ठा ढळल्यामुळे त्यांना सत्ता, वतने व सरंजाम यांपुढे काही दिसेचना. याचा एक घोर परिणाम असा झाला की, यांतील अनेक घराण्यांची शक्ती एकमेकांशी भांडण्यात, प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढाई करण्यात खर्च झाली. संताजी व धनाजी यांच्यापासून हा प्रकार जो सुरू झाला तो थेट शिंदे-होळकरांच्या लढाईपर्यंत अखंड चालू होता. मराठी राज्याचे शासन एकमुखी असावे हे अनेक मराठा सरदारांना मान्यच नव्हते. त्यामुळे कोल्हापूरचा संभाजी, त्र्यंबकराव दाभाडे, रघूजी भोसले, राघोबा, मोरोबा यांना नमविण्यातच शाहूमहाराज व पेशवे यांची निम्मी शक्ती खर्च झाली. मराठ्यांत राष्ट्रनिष्ठा जागृत असती, 'मराठा तितुका मेळवावा' याचा अर्थ त्यांना उमगला असता तर आपसात लढण्यात वाया गेलेली शक्ती संघटित झाली असती व मग तिला 'महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे' हे ध्येय सिद्ध करता आले असते.