पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१६७
 

शत्रू राहणार नाही व मग त्यांना शिंदे-होळकरांची गरजच राहाणार नाही व ते आपल्याला धोतरे बडवायला लावतील, ही मल्हाररावांना चिंता होती, म्हणून नजीबाला ते मानसपुत्रच मानीत. हैदराचा पूर्ण पराभव झाला तरी त्याला तहाच्या वेळी झुकते माप साधवरावांना द्यावे लागले. कारण राघोबा व तत्पक्षीय सरदार त्याच्या पाठीशी उभे होते. या लोकांनी निजामाचे व हैदराचे रक्षण केले ते याच हेतूने. शत्रू संभाळून ठेविला पाहिजे. उद्या माधवरावाविरुद्ध लढावे लागले तर त्याचे साह्य होईल ! प्रत्यक्ष सरदारांची ही भावना होती. यातून त्यांचे दिवाण, सल्लागार यांनी काही या देशद्रोही वृत्तीस आळा घालावा, तर ते बाजूस राहून तेच स्वामिद्रोहाचा सल्ला देऊन सर्व कारस्थाने शिजवीत असत. राक्षसभुवनच्या लढाईच्या आधी देवाजीपंत चोरघडे हा जो भोसल्यांचा कारभारी त्याने जानोजी भोसले यास सल्ला दिला की, 'निजामास घेऊन खानदेशात छावणीस जावे, आजपर्यंत पेशव्यांनी कारभार केला, आता त्यास निर्दाळून आपणच दौलत करावी.' (रियासत, मध्यविभाग, आवृत्ती १९२५, पृ. ५५) सखारामबापू हा राघोबाचा कारभारी. त्याने फितुरीची किती कारस्थाने शिजविली हे प्रसिद्धच आहे. सरदेसाई लिहितात, 'प्रत्येक सरदाराजवळ शहाणपणाची घमेंड मिरविणारे व येनकेनप्रकारेण पेशव्यास गोत्यात आणून आपला वैयक्तिक स्वार्थ साधणारे कारभारी लोक असत. हे कारभारी बहुधा ब्राह्मणवर्गातले असत. ब्राह्मणांतच सारस्वत, प्रभू इत्यादींचा अंतर्भाव समजावयाचा. ताराबाईजवळचे पुराणिक व उपाध्ये, प्रतिनिधीचा यमाजी शिवदेव, दाभाड्यांचा यादो महादेव, भोसल्याजवळचा कोन्हेरेराम, शिंद्यांचे रामचंद्रबाबा, होळकरांचे चंद्रचूड या मंडळींस मराठी राज्य, त्याचे हेतू, पुढील कर्तव्य व प्रस्तुतच्या अडचणी यांची जाणीव बहुधा नसे.' (मध्य विभाग २, पृ. २३५) पेशव्याला गोत्यात आणावे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण तो वैयक्तिक स्वार्थासाठी; देशासाठी वा मराठी दौलतीसाठी नव्हे आणि पेशव्याला गोत्यात आणायचे ते निजाम, हैदर, रोहिले यांच्या साह्याने, स्वतःच्या हिमतीने नव्हे. सर्व मराठमंडळाने एकजूट करून शाहूच्यानंतर सातारच्या गादीवर जानोजी भोसल्यासारखा कर्ता तरुण पुरुष बसविला असता आणि अभेद्य एकी करून मग पेशव्यास दूर केले असते तर मराठी दौलतीचे हितच झाले असते; पण ती हिंमत, ते धैर्य व ते कर्तृत्व व तशी उदात्त निष्ठा कोणाच्याही जवळ नव्हती. माधवरावांच्यानंतर पुढील