पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
 

त्यांतील भूप्रदेशही तोडले जात आहेत. सिंध गेला, बलुचिस्तान गेला, वायव्य प्रांत गेला, पंजाब निम्मा गेला, पूर्व बंगाल गेला, लडाख चीनने घेतला. काश्मीर, आसाम त्याच मार्गावर आहेत आणि आता कच्छला सुरुंग लागले आहेत. आणि या सर्व बाबतीत आपण वाटाघाटीचे दरवाजे कायम मोकळे ठेवलेले आहेत ! लवकरच हे प्रदेश वादग्रस्त ठरतील. म्हणजे आपणच तसे जाहीरपणे घोषित करू, म्हणजे ते गेले तर फारसे दुःख होणार नाही !
 जे प्रांत अजून भारताच्या सत्तेखाली आहेत त्यांतही हिंदूंच्या देवतांचा, स्त्रियांचा व शिवछत्रपतींसारख्या पुण्यपुरुषांचा कोणीही केव्हाही अपमान करू शकतो. आणि अशा वेळी शांततेचा भंग होऊ नये म्हणून हिंदूंनाच अटक करण्यात येते. हे सर्व पाहून मनात प्रश्न येतो की, हिंदुसमाज हा समाज आहे काय ? या लोकसमुदायाला समाज म्हणून घेण्याचा काही हक्क आहे काय ?
 प्रारंभकालापासून हिंदूंच्या इतिहासाचे विहंगमावलोकन करून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा या प्रकरणात प्रयत्न करावयाचा आहे. हिंदुसमाज हा समाज आहे काय, आज नसल्यास पूर्वी होता काय, असल्यास कधी होता, तो कोणाच्या प्रयत्नाने झाला होता, त्याच्यात दृढता, दुर्भेद्यता किती होती, ती पुढे केव्हा व कशामुळे नष्ट झाली, आज ही संस्कृती नामशेष होऊ पहात आहे असे विचारवंतांना वाटते त्याची कारणे काय, आणि हिंदूंचे व त्यांच्या संस्कृतीचे भवितव्य काय आहे इत्यादी समस्या आपल्यापुढे आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासाच्या प्रकाशात त्यांची चिकित्सा आपल्याला करावयाची आहे.

आर्य कोण ?
 आर्य लोक हिंदुस्थानात बाहेरून आले की ते मूळचे येथलेच होते हा प्रश्न वादग्रस्त आहे. पण त्यात आपल्याला शिरण्याचे कारण नाही. ते येथले असोत वा बाहेरून आलेले असोत, आपल्याला त्यांच्या संस्कृतीच्या उदयकाळाची स्थिती पहावयाची आहे. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी एक पराक्रमी, प्रज्ञासंपन्न, विजिगीषु व सुसंस्कृत समाज म्हणून जेव्हा आर्य लोक भारतात उदयास येऊ लागले त्या वेळी भारतात शेकडो जमाती लहान लहान पुंज करून राहिलेल्या होत्या. द्रविड, असुर, राक्षस, वानर, दैत्य, दानव, नाग, निषाद, किरात, कैवर्त, दास, दस्यू, पुलिंद, शक, आंध्र, यवन, पणी, कांबोज, पारद, पल्हव,