पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

संस्कार तर नव्हतेच पण स्वामिनिष्ठाही ते ओळखीत नव्हते. म्हणजे मराठा सरदार हा एक पराक्रमाचे यंत्र बनला. ती एक जडशक्ती झाली. इंग्रजांनी यावे, मोगलांनी यावे, फ्रेंचांनी यावे, पोर्तुगीजांनी यावे, हबशांनी यावे, त्यांना ही यंत्रे पैसा टाकताच मिळत आणि मग ती स्वधर्मीय, स्वदेशीय लोकांवर, स्वतःच्या स्वामीवर वाटेल तो भडिमार करण्यास सज्ज होत. जमीन, वतन, पैसा एवढेच त्यांना दिसत असे. समर्थांनी म्हटलेच आहे, 'आम्ही पोटाचे पाईक, आम्हा नलगे आणिक, आम्ही खाऊ ज्याची रोटी, त्याची कीर्ती करू मोठी ॥' हीच टीका नानासाहेब सरदेसाई यांनी केली आहे. ते म्हणतात, 'अमात्याच्या कारस्थानाचा विचार मुद्दामच केला आहे. त्यावरून मराठमंडळाच्या मनोभावनांची बरीच कल्पना करता येते. आपण एक राष्ट्र आहो, आणि सर्वांनी मिळून हिंदुस्थानावर आपले स्वराज्य स्थापन करावयाचे आहे, ही कल्पना थोड्याबहुत चालकांच्या मनात कितीही असली तरी सामान्य महाराष्ट्र- जनतेच्या मनात ही राष्ट्रीय भावना बिलकुल नव्हती. स्वार्थ साधेल ते कृत्य करण्यास मराठमंडळापैकी बहुतेक सर्व व्यक्ती नेहमीच तयार असत. मग त्या ब्राह्मण असोत किंवा ब्राह्मणेतर असोत.' (मध्यविभाग- २, १९२१ आवृत्ती, पृ. २४३) यावरून दुही, फूट हीच मराठ्यांची प्रकृती होती आणि ऐक्य, संघटना, राष्ट्रभावना ही त्यांची केवळ विकृती होती, हे ध्यानात घेतले म्हणजे त्यांच्या सर्व कर्तृत्वाचा ग्रंथ नीट लागतो.

शत्रू रक्षिला पाहिजे :
 आपल्या धर्माच्या, देशाच्या, स्वामीच्या शत्रूला, पिढ्यान् पिढ्यांच्या हाडवैऱ्याला जाऊन मिळणे, त्यांच्याशी द्रोह करणे याची मराठ्यांना कसलीच खंत वाटत नसे. प्रारंभापासून अखेरपर्यंत एकही कालखंड मराठेशाहीत असा नव्हता की, जेव्हा मोठमोठे सरदार शत्रूला फितूर नव्हते. पेशवे आणि शिंदे ही दोन घराणीच याला अपवाद होती. त्यांच्याही निष्ठा ढळल्या तेव्हा साम्राज्यच बुडाले. नजीबखान, निजाम, हैदर यांचा एकदाच कायमचा निःपात का केला नाही असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर सोपे आहे. प्रत्येक वेळी त्यांना संभाळायला मराठे सरदारच, त्यांचा पक्ष घेऊन उभे असत. नजीबखान रोहिल्याला अनेक वेळा मल्हारराव होळकरांनी वाचविला. त्याला मारले तर पेशव्यांना कोणी