पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१६५
 

हे शिवछत्रपतींनी सांगितले होते. हे महातत्त्व वरीलपैकी कोणा तरी धर्माचार्यांनी समाजाला उपदेशिले काय ? त्याच्या हाडीमासी खिळविण्याचा प्रयत्न केला काय ? हरिदासांनी, पुराणिकांनी, कीर्तनकारांनी याचा उच्चार तरी केला काय ? शेकडो वर्षे मनावर झालेले ते जुने संस्कार जाऊन धर्म हे संघटनतत्त्व होय, परधर्मीयांना मिळून स्वधर्मीयांवर घाला घालणे अधर्म होय, या नव्या विचारांचे संस्कार एरवी व्हावे कसे ? पश्चिम युरोपात इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, इग्लंड या देशांत राष्ट्रधर्म, बुद्धिप्रामाण्य, इहवृत्ती, प्रवृत्तिधर्म विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता या विषयांवर शेकडो ग्रंथ या काळात झाले. तेव्हा त्या जुनाट शब्दप्रामाण्यवादी, परलोकनिष्ठ धर्माचे संस्कार पुसून जाऊन तेथे नवा मानव निर्माण झाला आणि याला धर्मक्रान्तीपासूनच प्रारंभ झाला. तशी धर्मक्रान्ती येथे झालीच नाही. ती एकट्यादुकट्याने होत नसते. ग्रंथ, प्रवचने, व्याख्याने यांचा पाऊस त्यासाठी पडावा लागतो. कृतिशील आदर्श त्यासाठी डोळ्यांपुढे असावे लागतात; पण येथल्या कवींनी, ग्रंथकारांनी, आचार्यांनी, पुराणिकांनी, कीर्तनकारांनी या धोरणाने काही केले नाही. स्वराज्य, स्वातंत्र्य यांचा त्यांच्या साहित्याशी, काव्यांशी, धर्माशी, कसलाही संबंध नव्हता. दुही, फूट, स्वजनद्रोह, स्वामिद्रोह, देशद्रोह यांचा त्यांच्या धर्मप्रवचनात केव्हाही, कवीही अधिक्षेप झाला नाही. कोणी इतर जातीच्या हातचे पाणी प्याला, कोणी सोवळे केले नाही, कोणी अभक्ष्यभक्षण केले, एकादशीला कांदा खाल्ला, कोणा मुलीच्या लग्नाला उशीर झाला तर मात्र हे आचार्य, हे शास्त्रीपंडित तत्काळ खवळून उठत व बहिष्काराचे अस्त्र उपशीत. बाजीराव मद्यमांस सेवन करीत असे, त्याने मस्तानी ठेविली होती यासाठी त्याच्यावर बहिष्कार घालण्यास पुण्याचा ब्रह्मवृंद उद्युक्त झाला होता. कारण त्यामुळे हिंदुधर्म रसातळाला जाणार होता. त्याच्या पराक्रमामुळे, दिल्लीवरील स्वारीमुळे, निजाम, बंगष यांना त्याने पराभूत केल्यामुळे हिंदुधर्माचा काही फायदा होतो, त्याचे रक्षण होते असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.

पराक्रमाची यंत्रे :
 शाहूच्या प्रारंभकाळी सर्व प्रमुख सरदार मोगलांना जाऊन मिळाले आणि नंतर निजामाला ! याचा अर्थ असा की, मराठ्यांवर राष्ट्रनिष्ठेचे वा धर्मनिष्ठेचे